नाशिकरोड ‘हॉटस्पॉट’च्या दिशेनेमाय अहमदनगर वेब टीम
नाशिक - माजी महापौरांसह परिसरात शुक्रवारी सायंकाळी प्रसिद्ध झालेल्या अहवालात सुमारे चाळीस रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने परिसरात घबराट निर्माण झाली आहे. गेल्या तीन ते चार दिवसापासून नाशिकरोड परिसरात पॉझिटिव्ह रुग्णांची सातत्याने वाढ होत असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिक व शासकीय यंत्रणा हतबल झाली आहे.

परिसरातील देवळालीगाव व विहितगाव याठिकाणी यापूर्वी करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आढळून येत नव्हती. परंतु तीन ते चार दिवसापासून दोन्ही ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. देवळालीगावात आतापर्यंत आठ रुग्ण आढळून आले. मात्र तरीही नागरिकांकडून काळजी घेतली जात नाही. अनेक ठिकाणी घोळक्याने नागरिक व युवक गप्पा मारत असतात. त्यामुळे कुठलेही सामाजिक आंतर राखले जात नाही. तसेच विहितगाव परिसरात शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालात मोठ्या संख्येने रुग्ण आढळून आले. शहर परिसरात एकाच दिवशी तब्बल ४०रुग्ण आढळून आले असून त्यामध्ये दत्तमंदिर रोड, जगताप मळा, खर्जुल मळा, गिते मळा, जय भवानी रोड, सिन्नरफाटा परिसर आदी भागातील रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आढळून येत असूनही नागरिकांकडून कुठल्याही नियमांचे पालन केले जात नाही. परिसरातील दुकानांत सामाजिक सुरक्षेच्या अंतराचे पालन होत नाही. सायंकाळी पाच वाजेनंतर दुकाने बंद करण्याची वेळ असतानासुद्धा अनेक ठिकाणी दुकाने उघडेच असतात. त्यामुळे रस्त्यावर गर्दी दिसते. सात वाजेनंतर अनेक नागरिक रस्त्यावर फिरताना दिसतात. एका वाहतूक पोलीस कर्मचार्‍यालासुद्धा करोनाची लागण झाली असल्याचे समजते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post