स्वस्तात सोने घेणे पडले महागात !माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - स्वस्तात सोने देण्यासाठी चौघांनी एका व्यक्तीला मोकळ्या शेतामध्ये बोलावून मारहाण केली. त्याच्या खिशातील 12 हजार रूपयांची रक्कमही काढून घेतली. नगर- दौंड रोडवरील पांजरपोळ (ता. नगर) पासून एक किलोमीटर असलेल्या मोकळ्या शेतात रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. फसवणूक झालेले अजय विष्णू घुसळे (वय- 32 रा. सिडको एम- 7, औरंगाबाद) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सुरेश जेठला काळे (वय- 38), ताई सुरेश काळे (वय- 35 दोघे रा. अरणगाव ता. नगर), आप्पासाहेब बजरंग गिर्‍हे (वय- 25) सुखदेव म्हतारदेव वासन (वय- 50 दोघे रा. खंडाळा ता. नगर) यांच्याविरूद्ध फसवणूक, जबरी चोरी आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कोतवाली पोलिसांनी चौघा आरोपींना सोमवारी अटक केली आहे.

आरोपींनी फिर्यादीला 10 लाख रूपये किलो सोने देण्याचे कबूल केले होते. स्वस्तात सोन्याचा व्यवहार करण्यासाठी आरोपींनी रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास फिर्यादीला नगर- दौंड रोडवरील एका मोकळ्या शेतात बोलावून घेतले. ठरल्याप्रमाणे दुपारच्या वेळी सर्व जण शेतामध्ये जमले. त्यावेळी आरोपी यांनी फिर्यादीला एक अट घातली. सोने खरेदीसाठी निम्मे पैसे घेऊन या, त्याशिवाय सोने दाखविणार नाही. यावरून त्यांच्यात वाद झाले. या वादातून आरोपींनी फिर्यादीला लाकडी दांडक्याने मारहाण केली. फिर्यादीच्या खिशामध्ये असलेली 12 हजार रूपयांची रोख रक्कम आरोपींनी बळजबरीने चोरून नेली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कचरे करीत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post