ओ साहेब, तेवढं आमचं बघा ना !


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - अर्धवट असलेल्या स्थायी समिती सदस्यांचा कोरोम पूर्ण करण्याचा मुर्हूत अहमदनगर महापालिकेने अखेर काढला. स्थायी समितीमध्ये नव्याने आठ सदस्य नियुक्तीसाठी 30 जुलैला महासभा बोलविण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेचे राजकारण तापणार असून इच्छुक नगरसेवकांनी ‘ओ साहेब, तेवढं आमचं बघा ना’ असे म्हणत नेत्यांकडे फिल्डींग सुरू केली आहे.

ऑनलाईन सभेत आठ नवीन सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याने सभापती पदाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार आहे. महापालिका स्थायी समितीचे सोळा सदस्य असून त्यातील आठ सदस्य निवृत्त झाले आहेत. निवृत्त सदस्यांच्या जागी नव्याने आठ सदस्यांची नियुक्ती महासभेत केली जाते, मात्र लॉक डाऊनमुळे महासभा होऊ शकली नाही.

शासनाने ऑनलाईन सभा घेण्यास हिरवा कंदील दाखविल्याने महापौर बाबासाहेब वाकळे यांनी येत्या 30 जुलै रोजी महासभा बोलविली आहे. स्थायी समितीच्या आठ सदस्यांची नियुक्ती करणे हा प्रमुख विषय महासभेसमोर आहे. राजकीय पक्षांचे महापालिकेतील गटनेते सदस्यांची नावे सुचवतील. गटनेत्यांच्या सुचनेनुसार नवनिर्वाचित सदस्यांची घोषणा महापौरांकडून केली जाईल. स्थायी समितीत नव्याने आठ सदस्यांची नियुक्ती केल्यानंतर स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीचाही मार्ग मोकळा होणार आहे.

स्थायीमधील एकूण बलाबल

राष्ट्रवादी 5

शिवसेना 5

भाजप 4

कॉग्रेस 1

बसपा 1

कोणत्या पक्षाचे किती नियुक्त

राष्ट्रवादी 5

शिवसेना 2

भाजप 2

कॉग्रेस 1

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post