पोलिस अधिकार्‍याच्या जाचाला कंटाळून पत्नीची आत्महत्या



माय अहमदनगर वेब टीम
श्रीगोंदे - वाशी येथे सहायक पोलिस निरीक्षक पदावर असणार्‍या पांडुरंग ज्ञानदेव देवकाते याच्या अनैतिक संबंधांना कंटाळून पत्नी अमिता पांडुरंग देवकाते (वय 27) यांनी थिटे सांगवी येथे राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. ही घटना 14 जुलै रोजी दुपारी एकच्या सुमारास घडली.

या प्रकरणी कैलास कोकरे यांच्या फिर्यादीवरून  पांडुरंग देवकाते (पती), ज्ञानदेव देवकाते (सासरे), संध्या देवकाते (सासू), गणेश देवकाते (दीर) यांच्या विरोधात श्रीगोंदे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती समजताच पोलिस उपअधीक्षक संजय सातव, पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश गावित यांनी थिटे सांगवीला भेट दिली

मृत अमिताचे वडील कैलास कोकरे (रा. पारोडी, ता. शिरुर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 31 जानेवारी 2016 मध्ये अमिताचा विवाह पांडुरंग देवकाते यांच्याशी झाला. काही दिवस सुखाचे गेल्यानंतर पती पांडुरंग याचे त्यांच्याच खात्यातील एका दुय्यम दर्जाच्या पोलिस अधिकार्‍याशी अनैतिक संबंध असल्याची माहिती अमिताला समजली. या संबंधाला अमिताने विरोध केल्यानंतर पांडुरंग याने अमिताला मारहाण केली. त्याचबरोबर चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरहून दहा लाख रुपये आणावेत, यासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ करू लागला.जावयाची मागणी पूर्ण करत त्याला चारचाकी गाडी घेऊन दिली. मात्र त्यानंतरही अमिताचा त्रास संपला नाही.

नोव्हेंबर 2019 मध्ये पांडुरंगने अमिताशी वाद घालून तिला वाघोली येथे सोडून दिले होते. याबाबत शिक्रापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक शेलार यांनी पांडुरंग देवकाते याला समजावून सांगत पुन्हा अमिताला त्रास होणार नाही, याबाबत लेखी लिहून घेतले होते; मात्र तरीही पांडुरंग व त्याचे आई, वडील, दीर हे जाणीवपूर्वक त्रास देत होते, असे फिर्यादीत म्हटले आहे.

आरोपी पांडुरंग देवकाते हा 15 दिवसांपूर्वी अमिताला थिटे सांगवी येथे सोडून तो वाशी येथे निघून गेला होता. 14 जुलै रोजी दुपारी 1 वाजता तिने राहत्या घरात गळफास घेतला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अमित माळी करीत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post