लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर कोरोनाचे राज्यात ७५ टक्के नवे रुग्ण


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात संसर्ग झालेल्या राज्यातील रेड झोन भागातील लॉकडाऊनचे निर्बंध जूनमध्ये शिथिल केल्यानंतर राज्यात 75 टक्के नवे कोरोनाचे रुग्ण सापडल्याची माहिती समोर
आली आहे.

1 जून ते 13 जुलै या कालावधीत राज्यात 1 लाख 93,269 रुग्ण सापडले असून हे प्रमाण एकूण रुग्णांच्या 74.07 टक्के इतके आहे. कोरोनाच्या महामारीला अटकाव घालण्यासाठी मार्च अखेरीपासून लागू करण्यात आलेले लॉकडाऊनचे निर्बंध मिशन बिगीन अगेन मोहिमेंतर्गत 3 जूनपासून हळूहळू शिथिल करण्यात आले.  निर्बंध शिथिल केल्याने अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी व्यावसायिक हालचाली गतिमान करण्यात येऊ  लागल्या. असे असले तरी हे वातावरण कोरोनाच्या फैलावासाठी मात्र अनुकूल ठरले.

3 जूनपासून सायकलींग, जॉगींग, धावणे यासारख्या शारीरिक व्यायामांना परवानगी देण्यात आली. यानंतर 5 जूनपासून मॉल्स, शॉपिंग सेंटर वगळून बाजारपेठा, दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली. याचवेळी राज्यातील सर्वात मोठे हॉटस्पॉट असलेल्या व लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेल्या मुंबई महानगर विभागात आंतरजिल्हा प्रवासास परवानगीही देण्यात आली. 8 जूनपासून खासगी कार्यालयांना त्यांच्या 10 टक्के कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत काम करण्यास परवानगी देण्यात आली.

मुंबई महानगर विभागातील 9 महापालिकांसह राज्यातील पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती व नागपूर आदी महापालिकांची ठिकाणे रेड झोनमध्ये येतात. कोरोना महामारीचा या भागात पुन्हा फैलाव सुरु झाल्याने याठिकाणी पुन्हा लॉकडाऊन जारी करणे भाग पडले. मुंबई महानगर विभागात येणार्‍या ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर व नवी मुंबई या महापालिकांच्या क्षेत्रात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन 19 जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post