या केंद्रीय पथकाने नगरची केली पाहणी ; केल्या या मोठ्या सूचना


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - कोरोना बाधित रुग्ण सापडलेल्या भागात संसर्ग होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून संबंधित भाग कंटेन्मेंट झोन जाहीर केला जातो. कंटेन्मेंट झोनचा आकार कमी करण्याची, तसेच रक्तदान वाढविण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्य विभागाचे पथकाचे प्रमुख डॉ. अरविंद कुशवाह आणि डॉ. सीताकांत बॅनर्जी यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

कोरोना आजार नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने केल्या जाणार्‍या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था (ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स) या संस्थेतील डॉ. अरविंद कुशवाह आणि डॉ. सीताकांत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पथक काल (दि.27) सकाळी नगरला दाखल झाले. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर, नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. साळवे आदींच्या उपस्थितीत या पथकाने जिल्हा रुग्णालयास भेट दिली.



जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांना दिल्या जाणार्‍या सुविधांसह, पथकाने रुग्णांची तपासणी व्यवस्था, प्रयोगशाळा, रक्तपेढी, आंतररुग्णांसाठी केलेली व्यवस्था याची पाहणी केली. डॉक्टर, परिचारिका आणि रुग्ण यांच्याशी प्रत्यक्षात संवाद साधून येथे मिळणार्‍या सुविधांची खात्री केली. रुग्णांसाठी असलेला आहार, औषधांचा साठा आदींचा आढावा घेतला.

सारी या आजाराचे रुग्णही जिल्ह्यात आढळून आले आहेत. या रुग्णांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयातील आर्थोपेडिक्स (अस्थिव्यंग) आणि स्त्रीरोग या दोन विभागांत स्वतंत्र दालन उभारले आहे. या विभागालाही भेट देऊन केंद्रीय पथकाने आढावा घेतला.

या पथकाने खासगी कोविड सेंटरलाही भेटी दिल्या. सावेडीतील दीपक हॉस्पिटल या खासगी कोविड सेंटरला पथकाने भेट देऊन तेथे रुग्णांकडून आकारल्या जाणार्‍या बिलाची माहिती घेतली. या सेंटरमध्ये बिलाबाबत लावण्यात आलेल्या दरपत्रकाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. येथील रुग्णांशी ही संवाद साधून मिळणारे उपचार आणि आरोग्य सुविधांबाबत चर्चा केली. त्यानंतर या पथकाने पाईपलाइन रस्त्यावरील श्रमिकानगर या कंटेन्मेंट झोनला भेट दिली. या झोनमध्ये राहणार्‍या नागरिकांशी चर्चा केली. त्यांच्या अडचणी समजावून घेेतल्या. कंटेन्मेंट झोनचा आकार मोठा असल्याने तो कमी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले.

सावेडीतील पटियाला हाऊस या ठिकाणी होणार्‍या नवीन खासगी कोविड सेंटरमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांची पाहणी केली. खासगी कोविड सेंटर शहरात उभारले जात आहेत, याबद्दल समाधान व्यक्त केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये प्रशासकीय अधिकार्‍यांची बैठक घेतली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post