बीसीसीआयने तयार केला आयपीएल 'ॲक्शन प्लॅन' आता...माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - आयपीएल कार्यकारणीची शुक्रवारी टेलिकॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होणार आहे. या बैठकीत संघ मालक, प्रसारक आणि केंद्रीय प्रायोजक यांचा समावेश असणार आहे. ही बैठक रविवारी आणि सोमवारीही होणारी आहे. या बैठकीत युएईत १९ सप्टेंबरपासून होणाऱ्या आयपीएल स्पर्धेचा फायनल प्लॅन तयार करण्यात येणार आहे. 

दरम्यान, बीसीसीआयने एका इंग्रजी वृत्तसंस्थेला आयपीएलच्या १३ व्या हंगामाच्या तयारीसंदर्भात माहिती दिली. यावेळी संघ मालकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. आयपीएल कार्यकारणीचे संचालक ब्रिजेश पटेल यांनी 'नेहमीच्या आयपीएल हंगामांप्रमाणेच खेळाडूंच्या राहण्याची, प्रवासाची, सोयी सुविधांची जबाबदारी संबंधित संघ मालकाकडेच असणार आहे. यात कोणताही बदल होणार नाही. फक्त कोरोनामुळे एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर अंमलात आणण्यात येईल.' असे सांगितले. तसेच बीसीसीआय आपला प्लॅन युएईशी शेअर करणार आहे. 


 
बायो सिक्योर बबल : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक प्रोटोकॉल आखण्यात येणार आहे. प्रत्येक फ्रेंचायजीला स्वतःचा असा एक बायो सिक्योर बबल करायचा आहे. त्यात संघ फक्त बीसीसीआयने आखून दिलेल्या क्षेत्रातच मर्यादित लोकांशीच संपर्क ठेवेल. याच प्रकारचा बबल बीसीसीआय, आयएमजी कर्मचारी, प्रसारक यांच्यासाठी तयार करण्यात येणार आहे. कोणालाही व्यक्तीला बाहेरच्या व्यक्तीबरोबर संपर्क ठेवता येणार नाही. 

उत्पन्न मॉडेल : ५१ दिवसांत सगळे ६० सामने खेळले जाणार आहेत त्यामुळे बीसीसीआयच्या केंद्रीय उत्पन्न मॉडेलमध्ये कोणताही बदल करण्यात आलेले नाहीत. जर आयपीएल झालेच नाही तर फ्रेंचायजीला कोणताही पैसा मिळणार नाही. 

प्रवास आणि निवास : संयुक्त अरब अमिरातीमध्ये प्रवास आणि निवासाबाबत फ्रेंचायजींना त्यांचा त्यांचा निर्णय घ्यायचा आहे. बीसीसीआय संयुक्त अरब अमिराती प्रशासनाबरोबर हॉटेलच्या भाड्यात सवलत मिळावी यासाठी समन्वय साधेल. त्यानंतर फ्रेंचायजीला बीसीसीआयने दिलेल्या पर्यायाचा स्वीकार करायचा की आपली सोय आपणच करायची याचे स्वातंत्र्य आहे. नेहमीच्या आयपीएल प्रमाणे फ्रेंचायजी आपल्या खेळाडूंना विमानाने युएईला घेऊन जाईल आणि परत आणेल.

वैद्यकीय सहाय्य : फ्रेंचायजींना त्यांच्या वैद्यकीय पथकाची सोय स्वतःच करायची आहे. बीसीसीआय फक्त केंद्रीय आरोग्य पथकाची व्यवस्था करेल. खेळाडू आणि सहाय्यक कर्मचारी वर्ग युएईत दाखल झाल्यानंतर त्यांची चाचणी करुन घेण्याची जबाबदारी फ्रेंचायजींची असणार आहे. त्यानंतर त्यांनी बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाबरोबर कायम संपर्कात रहायचे आहे. प्रत्येक फ्रेंचायजीचे वैद्यकीय पथक हे त्या संघाबरोबर सुरक्षा कवचातच राहणार आहे. 

बदली खेळाडू : आधीच्या बदली खेळाडूच्या धोरणात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. फ्रेंचायजींना एक्स्ट्रा खेळाडू घेऊन जाण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे जेणेकरून आयत्यावेळी खेळाडूला बोलवावे लागणार नाही.

बोर्ड आणि आयपीएल कार्यकारणी या सर्व बाबींवर विचार करुन ड्राफ्ट तयार करणार आहे. त्यानंतर या पॉलिसीवर शनिवारी होणाऱ्या बैठकीत इतरांशी आणि फ्रेंचायजींसी चर्चा केली जाईल. पटेल म्हणाले 'ज्यावेळी ही पॉलिसी आम्ही फ्रेंचायजींना दाखवू त्यावेळी नक्कीच काही प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आम्हाला तयार राहण्याची गरज आहे.'

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post