पहिल्याच दिवशी 22 व्यक्तींवर कारवाई; 16 हजार 600 रुपयांचा दंड वसुल
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी लागू केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर महापालिकेकडून आता कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून महापालिका व पोलिसांची संयुक्त पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकांनी पहिल्याच दिवशी शुक्रवारी (दि.3) दुपारपर्यंत शहराच्या विविध भागात 22 जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून 16 हजार 600 रुपयांचा दंड वसुल केला आहे.

नगर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस मोठया प्रमाणात वाढतच असल्याने व दररोज कोरोनाचे नवीन रुग्ण सापडत असल्याने, नवीन भाग कंटेन्मेंट एरिया (प्रतिबंधीत क्षेत्र) करण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी महापालिका, जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. मधल्या काळात लाकडाउन शिथील केल्यानंतर नागरिक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात येवून गर्दी करु लागले आहेत. सदर नागरिक सोशल डिस्टन्सींगचे पालन करताना दिसत नाहीत.

शहरात 144 कलम लागू असताना नागरीक घोळक्याने उभे राहत असल्याचे तसेच विनापरवाना फिरताना दिसून येतात. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण संख्येत मोठया प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते. त्याकरिता पोलिस प्रशासन व महापालिका यांच्या संयुक्त विदयमाने शहरात फिरते पथके नेमण्यात येत असून त्यांचेद्वारे जे नागरिक शहरात विनाकारण फिरताना दिसतील, तसेच मास्क न वापरताना व सोशल डिस्टन्सींग पालन करताना दिसणार नाहीत, वेळेनंतरही दुकाने चालू ठेवल्यास, रस्त्याच्या कडेला दुकानांवर गर्दी करुन थांबलेले दिसल्यास तसेच रस्त्यावर विनाकारण घोळक्याने थांबलेले दिसल्यास अशा नागरिकांवर सदरचे फिरते पथक, पोलीस यंत्रणा यांचेमार्फत दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

महापालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी प्रभाग समितीनिहाय चार पथके नेमली आहेत. या पथकांनी शुक्रवारी (दि.3) सकाळी पाईपलाईन रोडवरील एकविरा चौकापासून कारवाईला सुरुवात केली. तेथून प्रोफेसर कॉलनी, गुलमोहोर रोड, सिव्हिल हडको, दिल्लीगेट, सर्जेपूरा, कापड बाजार, गंजबाजार, माळीवाडा, मार्केटयार्ड चौक, जुने बसस्थानक चौक यासह विविध भागात फिरुन पाहणी केली. नियम मोडणार्‍या 22 नागरिकांवर यावेळी कारवाई करण्यात आली व त्यांच्याकडून 16 हजार 600 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. या कारवाईत पथक प्रमुख अभियंता रोहिदास सातपुते, परिमल निकम, शशिकांत नजान, स्वच्छता निरीक्षक तुकाराम भांगरे, राजेंद्र सामल यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी गणेश लयचेट्टी, राहुल साबळे, बाळासाहेब पवार, राजेश आनंद, रविंद्र सोनवणे, किशोर जाधव, भास्कर अकुबत्तीन यांच्यासह पोलिस कर्मचारी श्रीकांत खताडे व गांगर्डे आदी सहभागी झाले होते.


  • नागरिकांनी नियमांचे पालन करावे: मनपा आयुक्त
  • शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तो रोखण्याची जबाबदारी सर्व शहरवासीयांची आहे. त्यामुळे नागरिकांनी जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा यांनी सांगितलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी केले आहे. नाईलाजास्तव नियम मोडणार्‍यांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करावी लागत आहे ही दुर्दैवाची बाब आहे. तरी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करुन कटू कारवाई टाळावी, असेही आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी म्हटले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post