सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आरपीआयच्यावतीने अर्धनग्न आंदोलनमाय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- जातीय द्वेषातून मागासवर्गीय युवकांची हत्या होत असल्याच्या निषेधार्थ सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. सदर खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना फाशी देण्याची मागणी करण्यात आली.

प्रारंभी मार्केटयार्ड चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. फिजीकल डिस्टन्सच्या नियमाचे पालन करुन कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी आरपीआयचे शहराध्यक्ष सुशांत म्हस्के, दानिश शेख, पवन भिंगारदिवे, विनीत पाडळे, नईम शेख, भिम वाकचौरे, वैभव भालेराव, कार्तिक म्हस्के, सोनू गायकवाड, सोनू काळे आदी उपस्थित होते.

पुणे जिल्ह्यातील पिंपळे सौदागर येथे विराज जगताप या युवकाची प्रेमप्रकरणातून सहा जणांनी निर्घृण हत्या केली. विराज जगताप या युवकाचे प्रेम सवर्ण समाजातील मुलीशी असल्यामुळे विराजची हत्या करण्यात आली. सध्याची परिस्थिती पाहता पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना काही नवीन नसून, महाराष्ट्रात आतापर्यंत बर्‍याच ठिकाणी प्रेमप्रकरणातून मागासवर्गीय युवकांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात मागासवर्गीय युवकांच्या हत्या करण्याचे षडयंत्र सुरू असून, आरोपींना कठोर शिक्षा होत नसल्याने याची पुनरावृत्ती होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. राज्य सरकारने या प्रकरणाची त्वरीत दखल घेऊन हा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना फाशी देण्याची मागणी आरपीआयच्यावतीने करण्यात आली आहे. सदर निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. या प्रकरणी दखल न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post