कोरोनाकाळात जिल्हाबंदीचे उल्लंघन केल्याने जिल्हा क्रीडाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – कोरोना संचारबंदी काळात विनापरवाना मुख्यालय सोडून स्वत:च्या खाजगी कामाकरिता जिल्हा बंदीचे उल्लंघन करून पुण्याची सफर वेळोवेळी केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. राहुल द्विवेदी यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे यांच्याविरुद्ध बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

क्रीडाधिकारी कविता नावंदे ह्या गुरुवारी (दि.18) सकाळी आठ वाजता कारमधून पुण्याहून नगरकडे येत होत्या. पुणे-नगर महामार्गावर गव्हाणेवाडी चेक पोस्टवर त्यांची गाडी श्रीगोंद्याच्या नायब तहसीलदार योगिता ढोले व अप्पर तहसीलदार चारुशीला पवार यांनी अडविली आणि परवान्याची चौकशी केली. मात्र, त्यांच्याकडे परवाना नसल्याने त्यांना ताब्यात घेतले. कविता नावंदे या पुण्याला राहत असून त्यांनी संचारबंदी काळात पुणे-नगर असा असा प्रवास केला असल्याची महिती समजली.


जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी बुधवारीच (दि.17) श्रीगोंद्यात भेट देऊन कोरोना लॉकडाऊन संदर्भात आढावा बैठक घेऊन सूचना दिलेल्या होत्या. त्यानुसार श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र माळी यांनी जिल्हाबंदीचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करण्याकरिता एक पथक स्थापन केले होते.

सदर पथक गुरुवारी सकाळपासून गस्तीवर असताना वाहन तपासणी करत असताना जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे या विनापरवाना जिल्ह्यात प्रवेश करत असल्याने त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांच्याकडे पास नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर कविता नावंदे यांना बेलवंडी पोलिस स्टेशनला आणण्यात आले आणि जिल्हाबंदीचे उल्लंघन केल्यामुळे कोरोनाच्या काळात साथ रोग अधिनियम-1887 आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण कायदा-2005 मधील तरतुदींचा भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आल्याचे तहसीलदार महेंद्र माळी यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post