करोनाची लागण झाल्याचं दुपारी कळलं; रात्री निधन
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - कालपर्यंत मुंबई महापालिकेत कार्यरत असलेले पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अभियंता शिरीष दीक्षित यांचं काल रात्री माहीम येथील राहत्या घरी अचानक निधन झालं. दीक्षित यांचा काल दुपारी करोना रिपोर्ट आला होता. त्यात त्यांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यानंतर रात्री अचानक त्यांचा मृत्यू झाल्याने पालिकेत हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, दीक्षित यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही, असं सूत्रांनी सांगितलं.
पालिकेच्या पाणीपुरवठा विभागात प्रमुख अभियंता म्हणून काम करणारे शिरीष दीक्षित यांच्याकडे पालिकेच्या उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी)पदाचीही जबाबदारी होती. दीक्षित यांच्यात करोनाची लक्षणे जाणवू लागल्याने त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता. त्याचा रिपोर्ट काल आला. त्यात त्यांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. कालपर्यंत पालिकेत रोज कार्यरत असलेले दीक्षित संध्याकाळी घरी गेल्यानंतर रात्री ८च्या सुमारास त्यांचं अचानक निधन झालं. त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण समजू शकलं नाही. अभियांत्रिकी क्षेत्राची सखोल जाण असणारे, मितभाषी व निगर्वी स्वभावाचे दीक्षित हे महापालिका कर्मचारी व अभियंत्यांमध्ये लोकप्रिय होते. त्यांच्या जाण्याने महापालिका प्रशासनाने आपला एक कुशल अभियंता गमावला आहे. दीक्षित यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी आहे.
सन १९८७ मध्ये ‘दुय्यम अभियंता’ (सब इंजिनिअर) या पदावर रुजू होत, त्यांनी आपल्या महापालिका सेवेची सुरुवात केली होती. आपल्या महापालिकेतील सेवा कारकिर्दी दरम्यान पाणीपुरवठा विषयक अनेक महत्त्वाचे प्रकल्प कार्यान्वित करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. ‘कोरोना कोविड-१९’ च्या अनुषंगाने अधिक प्रभावी उपचारांसाठी महापालिकेद्वारे वरळी येथील एन. एस. सी. आय. येथे उभारण्यात आलेल्या ‘जम्बो फॅसिलिटी’ आणि ‘रेस्को’ येथे तयार करण्यात आलेल्या कोरोना अलगीकरण केंद्रांच्या उभारणीत दीक्षित यांचा मोलाचा वाटा होता. त्याचबरोबर तिथे वेळोवेळी अभियांत्रिकी विषयक विविध बाबींची पूर्तता करण्यातही त्यांचा पुढाकार होता.
Post a Comment