राज्यातील बोगस सैन्य भरती रॅकेट उघड




माय अहमदनगर वेब टीम
पुणे – सैन्यात भरतीच्या नावाखाली राज्यातील बेरोजगार तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक करणार्‍या रॅकेटचा पुणे ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या रॅकेटची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली आहेत. दरम्यान, शुक्रवारी (दि. 19) रात्री उशिरा भिगवण पोलीस ठाण्यात दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली असून शनिवारी (दि. 20) न्यायालयाने त्या दोघांना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. रॅकेटचा मुख्य सुत्रधार आकाश काशिनाथ डांगे (वय 25 रा. भाडळी बुद्रूक ता.फलटण जि.सातारा) यास फलटण येथून तर नितीन तानाजी जाधव (वय 30, रा. बारामती) यास बारामतीतून अटक घेतले आहे.

याप्रकरणी किशोर दादा जाधव (कुरकुंभ, ता. दौंद) यांनी काही दिवसांपूर्वी फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, आयएनएस शिवाजी लोणावळा येथे इंडीयन नेव्हीमध्ये स्टोअर किपरची नोकरी लावतो असे आमिष कुरकुंभ येथील किशोर जाधव यांना दोन वर्षांपासून आरोपी दाखवत होते. तर जाधव यांना विश्‍वास बसावा म्हणून आरोपी डांगे भारतीय नौदलात (नेव्ही) नेमणुकीस नसताना सुद्धा नौदलाचा पोषाख परिधान करून किशोर जाधव यांच्याकडून भिगवण व लोणावळा येथे एकूण 3 लाख 80 हजार रूपये घेत त्यांना आयएनएस शिवाजी लोणावळा या नावाचे बनावट ई-मेलवरून नौदलाचे बनावट नियुक्ती पत्र, अ‍ॅडमीट कार्ड पाठवून नोकरी न लावता फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच किशोर जाधव यांनी ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांची भेट घेऊन घडलेला प्रकार सांगितला. अधीक्षक पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना तात्काळ चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी चौकशी करून माहिती घेतली असता तरुणासह इतर अनेक बेरोजगार तरुणांची सैन्यदलात नोकरीच्या आमिषाने फसवणूक झाल्याची व यामागे मोठे बोगस रॅकेट असल्याची माहिती मिळाली. हे प्रकरण देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर स्वरूपाचे असल्याने यासाठी तात्काळ पुणे ग्रामीणचे गुन्हे शाखेचे विशेष पथक नेमून तपासास सुरुवात केली असता दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली आहे.

या कारवाईमध्ये सहायक निरीक्षक दत्तात्रय गुंड, महेश चव्हाण, पोलीस हवालदार अनिल काळे, रविराज कोकरे, महेश गायकवाड, निलेश कदम, उमाकांत कुंजीर, रौफ इनामदार, सचिन गायकवाड, पोलीस नाईक सुभाष राऊत, गुरूनाथ गायकवाड, संतोष सावंत, अक्षय नवले यांनी महत्त्वाची कामगिरी केली. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा व त्याची व्याप्ती महाराष्ट्रभर असल्याने पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला असून पुढील तपास सुरू आहे.

अनेक जिल्ह्यातील बेरोजगारांना गंडा
पुणे, सातारा, सांगली, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, वर्धा, वाशीम, जळगाव तसेच मराठवाडा, विदर्भ, जिल्ह्यातील दहावी, बारावी शिक्षण झालेल्या बेरोजगार तरूणांना तेथील ओळखीच्या एजंटमार्फत इंडीयन नेव्हीमध्ये नोकरी लावण्याचे खोटे अमिष दाखवून प्रत्येकी 2 ते 4 लाख याप्रमाणे कोट्यावधी रूपये घेऊन फसवणूक केल्याचे सांगितले.

कोट्यवधीचे घबाड
आकाश डांगेने बेरोजगार युवकांना गंडा घालून कोट्यवधी रुपयांची माया गोळा केली होती. काही वर्षांपूर्वी गरिबीत दिवस काढलेला डांगे फलटण पंचक्रोशीत फॉरच्युनर, वॅगेनार या आलिशान गाड्या फिरवत पैशाची उधळण करीत होता. नुकताच त्याने मोठा अलिशान बंगला बांधला होता. त्याच्याकडे एवढा पैसा अचानक कोठून आला? याची परिसरात दबक्या आवाजात चर्चा होती; परंतु हा महाठग आहे याची कोणाला कल्पनाच नव्हती. सैन्यदलात नोकरीचे आमिषाने फसवणूक झालेले बेरोजगार तरुण आपल्याला नोकरी मिळेल किंवा आपण दिलेले पैसे आज उद्या परत मिळतील या आशेने पोलिसात तक्रार देण्यास पुढे येत नव्हते.

फसवणूक झालेल्यांनी संपर्क साधावा
आरोपींनी कोणाची अशा प्रकारे फसवणूक केली असेल तर त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण पाषाण रोड, पुणे (फोन नं. 020 – 25651353) येथे संपर्क साधावा. बेरोजगार तरूणांनी सैन्यदलात व इतर सरकारी नोकरीस लावतो या अमिषाला बळी न पडता स्वतःची फसवणूक टाळावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post