त्या महिलेविरुध्द शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल; युवकांचे पोलीस उपअधिक्षकांना निवेदन



माय अहमदनगर वेब टीम
शिर्डी - करोना व्हायरसमुळे शिर्डी येथील साईबाबांंचे मंदिर 17 मार्चपासून भाविकांसाठी प्रतिबंधीत करण्यात आले असून मंदिर परिसरात कर्मचारी आणि अधिकारी वगळता इतरांना जाण्यास बंदी आहे. असे असताना साईबाबांच्या चावडीमध्ये शिवप्रिया नामक महिलने प्रवेश केल्याप्रकरणी साईबाबा संस्थानने शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

लॉकडाऊनमुळे साईबाबा मंदिर आणि परिसरातील व्दारकामाई, चावडी, मारुती मंदिर अशा ठिकाणी भाविकांना दर्शनासाठी आत प्रवेश करण्यास 17 मार्चपासून साईसंस्थानच्यावतीने मनाई करण्यात आली आहे. तसेच साईबाबा संस्थानने याठिकाणी सुरक्षा कर्मचारी तैनात करत बॅरिकेडींग केले आहे. मात्र गुरुवार दि.25 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास शिवप्रिया नामक महिलेने तिच्या वाढदिवसानिमित्तानं साईबाबांच्या चावडीत प्रवेश केला. आत जावून तिने चावडीतील साईंच्या फोटोजवळ फोटो सेशन केले असून बाहेर येवून सोशल मिडीयावर आपण लॉकडाऊनमध्ये चावडीत जावून दर्शन घेतल्याचं तिने सोशल मीडियावर कबुली दिली आहे.

याठिकाणचा सुरक्षा रक्षक पाच मिनिटे बाहेर गेल्यानं आपल्याला ही संधी मिळाली असल्याचं सांगत तिने हा व्हीडीओ सोशल मिडीआवर व्हायरल केला आहे. संबधीत शिवप्रिया ही महिला स्वतःला साईबाबांची भक्त म्हणून घेत शिर्डीतील सोशल वर्कर असल्याचे सांगत आहे. तसेच फोटो आणि व्हीडीओ आपल्या सोशल साईटवरुन अपलोड केले आहे. त्यामुळे शिर्डीकरांच्या तसेच पंचक्रोषीतील भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. जर साईंचे मंदिर सर्वांसाठी बंद आहे, अशाप्रकारे चोरुन जावून दर्शन घेणं चुकीचं आहे. सोशल मिडायवर हे वृत्त जाहीर केल्यानं बाहेरील भाविकांमध्ये संभ्रम निर्माण होत असून अशा वृत्तींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी येथील युवकांनी करत शिर्डी पोलीस उपविभागीय आधकारी सोमनाथ वाकचौरे यांना निवेदन दिले.

याप्रसंगी नितीन अशोक कोते, विकास गोंदकर, किरण कोते, अभिजित कोते, मंगेश उगले आदीसह युवक उपस्थित होते. महिलेनं चावडीत प्रवेश केल्याप्रकरणी साईबाबा संस्थानने या भागात बंदोबस्त वाढवला असून संस्थानच्या अधिकार्‍यांनी पाहणी केली आहे. सुरक्षा विभागाच्यावतीने सुरक्षा अधिकारी पाटणी यांनी शिर्डी पोलीसात सदरील महिलेच्या विरोधात तक्रार दाखल केल्याने शिवप्रिया नामक महिलेवर साथरोग प्रतिबंध कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करत कारवाई सुरु असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक गंधाले यांनी सांगितले आहे.

लॉकडाऊन दरम्यान अनेक भाविक आपल्या घरीच साईंचे दर्शन घेत आहे. तर काही भाविक चावडीजवळील बॅरिगटींग बाहेरुन साईंचे आशीर्वाद घेतांना दिसून येतात. त्यामुळे अशा पद्धतीनं सुरक्षा कर्मचारी दोन पाच मिनिटं बाहेर गेल्यावर आत प्रवेश करणं तसेच त्याचे फोटो आणि व्हीडीओ व्हायरल करत आपण इतरांपेक्षा वेगळे भक्त आहोत हे भासवन नक्की चूकीचे आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post