मुंबईसह आसपासच्या जिल्ह्यांत हाय अलर्ट



माय अहमदनगर वेब टीम
मुंबई/ नवी दिल्ली - अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र आता निसर्ग या चक्रीवादळात रूपांतरित होऊन महाराष्ट्र व गुजरातच्या किनाऱ्याकडे सरकत आहे. हवामान विभागाच्या मते, बुधवारपर्यंत हे वादळ तीव्र स्वरूपात दोन्ही राज्यांच्या किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे. वादळाच्या मार्गानुसार, बुधवारी दुपारी ते रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर आणि दमणच्या मध्ये अलिबागजवळ ताशी ११० किमी वेगवान वाऱ्यासह किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मुंबई प्रथमच भीषण वादळाच्या तडाख्यात येण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या सायक्लोन ई-अॅटलासनुसार १८९१ नंतर प्रथमच महाराष्ट्राच्या किनारी भागात चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. यापूर्वी १९४८ आणि १९८० मध्ये अशी स्थिती निर्माण झाली होती, मात्र तेव्ही ती चक्रीवादळात बदलली नव्हती. मुंबईसह आसपासच्या जिल्ह्यांत हाय अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग या ७ जिल्ह्यांना वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.

राज्यात 4 जूनपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता, नाशिकला पुराचा इशारा
हवामान खात्यानुसार, महाराष्ट्रात ४ जूनपर्यंत अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. गोव्याची राजधानी पणजीत सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. मुंबई आणि सुरतसह दोन्ही राज्यांतील ११ जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी केला आहे.

तयारी : गुजरात-महाराष्ट्रात एनडीआरएफची ३३ पथके तैनात, मुंबईत जमावबंदी
निसर्ग चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन महाराष्ट्र आणि गुजरातेत एनडीआरएफची ३३ पथके पाठवण्यात आली आहेत. यापैकी ११ पथके राखीव आहेत. महाराष्ट्रात १६ तर गुजरातेत १७ पथके तैनात केली आहेत.

अणुऊर्जा प्रकल्पामुळे चिंता : ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, चक्रीवादळाच्या मार्गावर रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील अणुऊर्जा प्रकल्प तसेच रसायनाचे कारखाने आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे विद्युत पुरवठा बंद होण्याचा धोका आहे.

१ ते २ मीटर उंचीच्या लाटांची शक्यता
मुंबई, रायगड,ठाणे जिल्ह्यांच्या किनाऱ्यावर १ ते २ मीटरपर्यंत लाटा उसळू शकतात, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या वादळात वाऱ्याचा वेग ताशी १०० ते ११० किमी राहील, प्रसंगी तो ताशी १२० किमीपर्यंत जाण्याची शक्यताही आहे. या काळात समुद्र खवळलेला राहील.

मान्सूनच्या प्रगतीला अनुकूल स्थिती
एक जून रोजी केरळात दाखल झालेला मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल स्थिती आहे. पुढील २४ तासांत मान्सून मध्य अरबी समुद्र, कर्नाटक, केरळचा उर्वरित भाग, तामिळनाडूचा काही भाग ते पुद्दुचेरीपर्यंत वाटचाल करण्याची शक्यता आहे.
चक्रीवादळ धडकले तर १०९ वर्षांनंतर मुंबईला बसेल फटका, हाय अलर्ट जारी
- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली.पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही उद्धव ठाकरेंशी चर्चा केली.
- गुजरातच्या किनाऱ्यालगतच्या गावांतून २० हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
- राज्यात एनडीआरएफच्या १० तुकड्या तैनात, तर ६ तुकड्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
- ज्या जिल्ह्यांना फटका बसण्याची शक्यता आहे, तेथील वीजपुरवठा आणि पाणीपुरवठा बंद करण्याची तयारी करण्यात आली आहे.
- नौदलाने मुंबईत ५ फ्लड रेस्क्यू पथके आणि ३ पाणबुड्यांची पथके तैनात केली आहेत. मुंबई, गोवा, पोरबंदरच्या नौदल हवाई स्टेशनवर नौदलाची डोर्निअर विमाने आणि हेलिकॉप्टरसह इतर यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली आहेत.

रेड अलर्ट
- ३ जूनसाठी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे या जिल्ह्यांत रेड अलर्ट देण्यात आला आहे. म्हणजे या जिल्ह्यांत २०४.४ मिमी पेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे.

ऑरेंज अलर्ट
- तीन जूनसाठी राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव,अहमदनगर या जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. म्हणजे या जिल्ह्यांत ११५.६ ते २०४ मिमीपर्यंत पावसाची शक्यता आहे.

यलो अलर्ट
- तीन जूनसाठी राज्यातील औरंगाबाद, जालना, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. म्हणजे या जिल्ह्यांत ६४.५ ते ११५ मिमीपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे.

राज्यातील इतर जिल्ह्यांत ग्रीन अलर्ट जारी करण्यात आला आहे. म्हणजेच तेथे १५.६ ते ६४ मिमीपर्यंत पाऊस पडू शकतो. नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत पुराचा इशारा आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post