राज्यपालांनी पाठवले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पदवी व पदव्युत्तर वर्गांच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षा या महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यानुसार होतील, अशी भूमिका महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंगळवारी पत्राद्वारे कळवली आहे. सीबीएसई व इतर केंद्रीय मंडळे परीक्षा घेऊ शकतात, मग विद्यापीठे का नाही घेऊ शकत, असा सवालही राज्यपालांनी केला. राज्यपालांच्या या पत्रामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षांविषयी संभ्रम वाढला आहे.

‘महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमातील तरतुदीनुसार विद्यापीठातील सर्व विषयांवर विद्यापीठाच्या कुलपतींचा अंतिम अधिकार असतो’, अशी आठवण राज्यपालांनी पत्रात केली आहे. ‘मुख्यमंत्र्यांनी परीक्षेसंदर्भात घेतलेला निर्णय आश्चर्यकारक असून विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम करणारा आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी परीक्षांच्या पर्यायासाठी कुलगुरूंची समिती नेमली होती. परंतु, अद्याप राजभवनला हा अहवाल पाठवला नाही. मी चर्चा केली, तेव्हा कुलगुरूंनी परीक्षा घेण्याची तयारी दर्शवली होती,’ असे राज्यपालांनी स्पष्ट केले. कुलगुरूंच्या समितीचा अहवाल मला जेव्हा मिळेल, त्यातील शिफारशींना मी संमती दिल्यानंतरच परीक्षेसंदर्भातला निर्णय होईल, असे राज्यपालांनी ठणकावले आहे. काहींना सरासरी गुण तर काही विद्यार्थ्यांना परीक्षा. असे एकाच अभ्यासक्रमासाठी दोन पर्याय कसे काय असू शकतात, असा प्रश्न करत राज्यपाल महोदयांनी या पत्रात मुख्यमंत्र्यांचे चांगलेच कान टोचले आहेत.

अंतिम वर्षाची परीक्षा न घेतल्यास व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना नोंदणीस अडचणी येऊ शकते, असे स्पष्ट करुन विद्यापीठ अनुदान आयोगाची मार्गदर्शक तत्वे राज्ये डावलू शकत नाहीत, असा दम राज्यपालांनी भरला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post