अहमदनगरकरांना सलग चौथ्या दिवशी धक्का ; आज 11 कोरोना बाधित सापडले


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - जिल्ह्यात मंगळवारी आणखी 11 नवीन रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्याचा एकूण रुग्णांचा आकडा 163 झाला असून 40 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले. तर 5 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

मंगळवारी कोरोना बाधित आढळलेल्या रुग्णांमध्ये अकोले तालुक्यातील सहा व्यक्तींचा समावेश आहे. यामध्ये जवळे येथील 48 आणि 24 वर्षीय महिला आणि 28 वर्षीय पुरुष बाधित आढळले तर वाघापूर येथील 32 आणि 40 वर्षीय महिला आणि 45 वर्षीय पुरुष बाधित आढळले. सर्व बाधित यापूर्वीच्या बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाली.

संगमनेर तालुक्यातील डिग्रज येथे 21 वर्षीय तर मालुंजा येथील 45 वर्षीय महिलांना कोरोनाची बाधा झाली आहे. या दोन्ही महिला यापूर्वीच्या बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना लागण झाली. तसेच श्रीगोंदा तालुक्यातील कांडेगाव येथील 75 वर्षीय महिलेलाही कोरोनाची बाधा झाली आहे. राहाता तालुक्यातील लोणी येथील 56 वर्षीय व्यक्ती बाधित आढळून आली. तसेच नगर शहरातील स्टेशन रोडवरील 33 वर्षीय महिलाही कोरोना बाधित आढळून आली.

आज आढळलेल्या 11 कोरोना बाधित रुग्णांबरोबरच जिल्ह्याचा आकडा 163 झाला आहे. यामध्ये महानगरपालिका क्षेत्रातील 26, अहमदनगर जिल्ह्यातील 87, इतर राज्य 02, इतर देश 08 इतर जिल्हा 40 असे रुग्ण आहेत.

आज आणखी 05 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील 01, संगमनेर येथील एक, पारनेर तालुक्यातील म्हसणे फाटा येथील एक आणि नगर तालुक्यातील 02 अशा एकूण पाच रुग्णांना बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे जिल्ह्यातील कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता 78 झाली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post