महाराष्ट्रात सरासरीच्या 98 टक्के पाऊस


माय अहमदनगर वेब टीम
पुणे -  महाराष्ट्रात सरासरीच्या 98 टक्के पाऊस पडेल असा अंदाज जेष्ठ हवामान तज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे. त्यामध्ये पाच टक्के कमी अधिक पाऊस पडण्याची शक्यता गृहित धरण्यात आली आहे.
डॉ. रामचंद्र साबळे हे दरवर्षी महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज वर्तवतात. हा अंदाज कमाल तापमान, सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वार्‍याचा वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषांवर आधारित आहे.

डॉ. साबळे यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार यंदा ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण चांगले राहील. तसेच कमी दिवसात अधिक पाऊस आणि काही काळ पावसात मोठे खंड असे हवामान राहील.
यंदा वार्‍याचा वेग, सूर्य प्रकाशाचा कालावधी व तापमान कमी आढळल्याने जून, जुलै महिन्यात राहुरी, कोल्हापूर, अकोला, पाडेगाव येथे पावसात मोठे खंड पडण्याची शक्यता असून दापोली, पुणे, सोलापूर, धुळे, निफाड, जळगाव, सिंदेवाही व परभणी येथे खंडाचा कालावधी कमी राहण्याची शक्यता असल्याचे डॉ. साबळे यांनी म्हटले आहे.

राज्याच्या सर्वच विभागांमध्ये सरासरीच्या तुलनेत 98 टक्के पावसाचा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात 98 टक्के पावसाची शक्यता आहे. माञ काही ठिकाणी कमी दिवसात जास्त पाऊस आणि काही काळ पावसाचे मोठे खंड असतील. अशा परिस्थितीत 65 मिलिमीटर पावसाची ओल असली तरच शेतकर्‍यांनी पेरणी करावी, असा सल्ला साबळे यांनी दिला आहे.
पश्चिम विदर्भात यंदा साधारण 670 मिलिमीटर पाऊस पडेल म्हणजेच सरासरी टक्केवारी 98 टक्के पाऊस पडेल.

मध्य विदर्भात सरासरी 938 मिलिमीटर म्हणजेच 98 टक्के, पूर्व विदर्भ विभागात 1167 मिलिमीटर, म्हणजे सरासरीच्या 98 टक्के, मराठवाडा विभागात 798 मिलिमीटर पाऊस म्हणजे सरासरीच्या 98 टक्के, कोकण विभाग 3272 मिलिमीटर म्हणजेच सरासरीच्या 98 टक्के, निफाड धुळे जळगाव या उत्तर महाराष्ट्रात सरासरीच्या 98 टक्के आणि पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर, कराड, सोलापूर राहुरी आणि पुणे 98 टक्के पावसाचा शक्यता डॉ. साबळे यांनी वर्तवली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post