36 तासांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया
माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये एलएसीजवळ झालेल्या हिंसाचाराच्या 36 तासानंतर अखेर मोदी सरकारची प्रतिक्रिया समोर आली आहे. गलवान येथे झालेल्या घडामोडींवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 19 जून रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय जवान शहीद होणे अतिशय वेदनादायी आहे. तरी भारतीय जवानांच्या धाडसावर अभिमान आहे असे म्हटले आहे. भारतीय जवानांनी धाडस दाखवून सर्वोच्च परंपरा निभावत आपल्या आयुष्याची आहुती दिली. त्यांचे बलिदान राष्ट्र कधीच विसरणार नाही असेही ते पुढे म्हणाले आहेत.
राजनाथ सिंह यांनी सांगितल्याप्रमाणे, चीनसोबत झालेल्या हिंसाचारात शहीद जवानांच्या कुटुंबियांसोबत आहोत. या कठिण समयी त्या कुटुंबियांच्या खांद्याला खांदा लावून अख्खा देश उभा आहे. आम्हाला आमच्या सैनिकांच्या धाडसावर गर्व आहे.
बलिदान व्यर्थ जाणार नाही -मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "जवानांचे बलिदान वाया जाणार नाही. देशाचे सार्वभौमत्व सर्वोच्च आहे. देशाचे संरक्षण करताना आपल्याला कुणीच अडवू शकत नाही. यासंदर्भात कुणीही शंका किंवा भ्रम ठेवण्याचे कारण नाही. भारताला शांतता हवी आहे. परंतु, चिथावणी दिल्यास योग्य ते उत्तर देण्यास भारत सक्षम आहे. आपले जवान लढताना शहीद झाले याबद्दल देशाला गर्व आहे." पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना सर्वांना 2 मिनिटांचा मौन देखील बाळगण्याचे आवाहन केले. यानंतरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीला सुरुवात झाली.
लडाखमध्ये समुद्रसपाटीपासून 14 हजार फुट उंचीवर गलवान येथे भारतीय सैनिक आणि चिनी सैनिकांमध्ये हिंसाचार झाला. यात चिनी सैनिकांनी भारतीयांवर काठ्या, दगड आणि धारदार शस्त्रांनी हल्ले केले. यामध्ये एका भारतीय कमांडरसह 20 जवान शहीद झाले. सोबतच, जखमी झालेल्या 135 भारतीय जवानांपैकी 4 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
देशभर चीनविरुद्ध निदर्शने
चीनने भारतीय सैनिकांवर केलेल्या हल्ल्यानंतर देशभर चीनविरोधात निदर्शने केली जात आहेत. यात ठिक-ठिकाणी चिनी वस्तू जाळून आपला निषेध व्यक्त केला जात आहे. दिल्लीतील चिनी दूतावासाबाहेर स्वदेशी जागरण मंच आणि काही माजी सैनिकांनी निदर्शने केली. सरकारने चीनच्या विरोधात कठोर कारवाई करावी. चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्यात यावा अशा मागण्या केल्या. यावेळी पोलिसांनी काही आंदोलकांना तात्पुरते ताब्यात देखील घेतले.
Post a Comment