रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी सारोळ्यात अर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथिक औषधाचे मोफत वाटप
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव सध्या सर्वांच्या चिंतेचा विषय आहे. कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत देखील आता वाढ होत आहे. मृत्यूदर कमी असला तरी कोरोनाला रोखायचे कसे? शिवाय, गाव-खेड्यांमध्ये देखील आता कोरोनाचा शिरकाव होत आहे. दरम्यान, कोरोनावर औषधोपचार उपलब्ध नसल्याने आता रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे हाच एकमेव पर्याय आहे. त्याच पार्श्वभूमिवर नगर तालुक्यातील सारोळा कासार गावात नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी सुमारे ५ हजार नागरिकांना होमिओपॅथीक अर्सेनिक अल्बम ३० या औषधाचे मोफत वाटप करण्यात आले आहे.
सारोळा कासार गावचे उपसरपंच जयप्रकाश पाटील यांच्या संकल्पनेतून तसेच शिक्षकनेते संजय धामणे, बाजार समितीचे निरिक्षक संजय काळे, नगर तालुका दुध संघाचे संचालक गोराभाऊ काळे, ग्रामपंचायत सदस्य गजानन पुंड, नामदेव काळे,सुनिल हारदे यांच्यासह मित्रमंडळाने लोकवर्गणी करून गावातील सुमारे ५ हजार नागरिकांसाठी होमिओपॅथीक अर्सेनिक अल्बम ३० या औषधाच्या १ हजार डब्या उपलब्ध केल्या. संपूर्ण गावठाण आणि वाड्यावस्त्यांवर घरोघरी हे रोगप्रतिकारक औषधाचे मोफत वितरण करण्यात येत आहे.
रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याकरता आर्सेनिक अल्बम 30 (Arsenic album 30) या गोळ्या उपयुक्त आहेत. त्यामुळे रोग प्रतिकारकशक्ती नक्की वाढेल. याचा फायदा कोरोनाच्या या लढ्यात होणार आहे. सर्व वयोगटातील व्यक्ती या गोळ्यांचे सेवन करू शकतात. शिवाय, कुणावर इतर कोणत्या रोगाचा इलाज सुरू असल्यास देखील या गोळ्या घेता येणार आहेत. रोज उपाशी पोटी तीन किंवा चार गोळ्या केवळ तीन दिवस घ्याव्या लागतील. त्यानंतर महिनाभरानंतर पुन्हा या गोळ्या तीन दिवस घ्यायच्या आहेत. लहान वयोगटातील मुलांना देखील या गोळ्या दिल्यास कोणताही धोका नाही, असे आयुष मंत्रालयाचे म्हणणे आहे.
त्यामुळे गावातील सर्व नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी होमिओपॅथीक अर्सेनिक अल्बम ३० हे औषध उपलब्ध करून ते संपूर्ण गावात वितरीत करण्यात आले आहे. संपूर्ण गावाला रोगप्रतिकारक औषध लोकवर्गणी करत मोफत वाटप करणारे सारोळा कासार हे जिल्ह्यातील पहिले गाव ठरले आहे.
Post a Comment