किती भांडवल करणार, किती वाद घालणार? - सिंधुताई सपकाळ


माय अहमदनगर वेब टीम
शिर्डी - निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दिलगिरी व्यक्त केली. मात्र, अजूनही त्यांच्या वक्तव्यावरुन तृप्ती देसाई आक्रमक असून आपल्या वकिलामार्फत इंदोरीकर महाराजांना त्यांनी नोटीस पाठवली आहे. यावर आता जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी इंदोरीकर यांच्या समर्थनार्थ वक्तव्य करत जगा आणि जगू द्या, असं आवाहन केले आहे. एका वक्तव्याचं किती भांडवल करणार, किती वाद घालणार? त्याने काही खून केला नाही, असे सिंधुताई म्हणाल्या.

कोपरगाव शहरात नगरपालिकेच्या वतीनं महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित व्याख्यानाला सिधुताई सपकाळ आल्या होत्या. आईच्या काळजातून या विषयावर व्याख्यान झाल्यावर पत्रकारांशी संवाद साधताना सिंधुताई यांनी इंदोरीकर महाराजांच्या वक्तव्याबाबत जगा आणि जगू द्या असं आवाहन केलंय. एका वक्तव्याच किती भांडवल करणार? किती वाद घालणार?, असा सवाल करत त्याने काही खुन केला नाही. इंदोरीकर महाराजांचे मोठे योगदान असून अनेक व्यसनाधीन तरुण इंदोरीकरांच्या प्रबोधनाने चांगल्या मार्गाला लागलेत. माणसातला माणुस त्यांनी घडवला आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर त्यांनी माफीही मागितलीय. त्यामुळे आता किती वाद वाढवणार? जगा आणि जगू द्या, अशी भावनिक साद सिंधुताई सपकाळ यांनी इंदोरीकर विरोधकांना घातलीय.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post