मुंबई - जगासह भारतातही लोकांची झोप उडवणाऱ्या कोरोना व्हायरसपासून महाराष्ट्र अजुनही सुरक्षित असल्याचा दावा सरकार करत आहे. राज्यात आतापर्यंत कोरोना व्हायरसचा एकही रुग्ण सापडलेला नाही अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी दिली. मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. राज्यात पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नका असा सल्ला देखील यावेळी त्यांनी दिला.
देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 28 पर्यंत पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी बुधवारी ही औपचारिक आकडेवारी जारी केली. सोबतच, आतापर्यंत केवळ 12 देशांतून भारतात येणाऱ्यांची चाचणी घेतली जात होती. आता मात्र भारतात येणाऱ्या प्रत्येकाची चाचणी घेतली जाईल असे केंद्र सरकारने सांगितले. कोरोनावर महाराष्ट्रात काय बंदोबस्त करण्यात आले असा सवाल टोपे यांना विचारण्यात आले. त्यावर बोलताना टोपे म्हणाले, आम्ही या व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी सतर्क आहोत. आतापर्यंत कोरोनावर कुठल्याही प्रकारचे औषध निर्माण झालेले नाही. त्यामुळे, आधीच उपाययोजना केल्यास सर्वोत्तम ठरेल. याच दिशेने महाराष्ट्र सरकारने प्रत्येक जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र वार्ड तयार केले आहेत. तसेच प्रत्येक रुग्णालयात 10 अतिरिक्त बेड लावण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
Post a Comment