महिला दिनीच पोलिसांनी रोखला बालविवाह



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – महिला दिनाच्या दिवशीच होणारा बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश आले आहे. नगर तालुक्यातील राळेगण म्हसोबा येथील एका मुलाचा विवाह काल महिला दिनी (दि. 8) राळेगण म्हसोबा येथेच एका अल्पवयीन मुलीशी होणार होता. तशी तयारी पूर्ण झाली होती. परंतु, कोणीतरी नगरच्या चाईड लाईनशी संर्पक करून याबाबत माहिती दिली. चाईल्ड लाईनच्या अधिकार्‍यांनी याबाबत नगर तालुका पोलिसांना कळविले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून हा बालविवाह रोखला.

नगर तालुक्यातील राळेगण म्हसोबा येथे राहणारे श्रीधर मुक्ताजी थोरात (वय- 45) यांचा मुलगा अक्षय थोरात याचा विवाह एका अल्पवयीन मुलीशी ठरला होता. या विवाहाची तारीख 8 मार्च अशी निश्चत करण्यात आली. जागतिक महिला दिनीच हा विवाह होणार अशी माहिती नगरच्या चाईड लाईन यांना मिळाली. त्यांनी संबंधीत माहिती नगर तालुका पोलिसांना कळविली. प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ.सागर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली नगर तालुक्यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकरसिंग रजपूत, पोलीस हवालदार राजु ससाणे, संभाजी डेरे, पोलीस नाईक खेडकर, बाळू कदम यांच्या पथकाने शनिवारीच (दि. 7) थोरात यांचे घर गाठले.

बालविवाह करणे कायद्याने गुन्हा आहे. तुम्ही बालविवाह करून नका. बालविवाह केल्यास कायदेशीर कारवाई होईल, असे सांगितले. तशी नोटीसपण त्यांना देण्यात आली. विवाहाची तयारी झाली असल्याने विवाह होण्याची शक्यता होती. परंतू, काल सकाळीच पोलिसांनी राळेगण म्हसोबा गाठून तो विवाह होऊन दिला नाही. अल्पवयीन मुलीशी विवाह करणार नसल्याचा जबाब पोलिसांनी घेतला. कायदेशीर नोटीस बजावून महिला दिनी होणारा बालविवाह रोखला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post