जामखेड गोळीबार; आरोपींना सहा तासात अटक


माय अहमदनगर वेब टीम
जामखेड – जामखेड शहरातील बीड रोडवर हवेत गोळीबार करून फरार आरोपी विकास थोरात व विशाल मगर यांना पोलीसांनी जामखेड तालुक्यातील डोणगाव शिवारातून सापळा रचून सहा तासाच्या आत अटक केली. पोलीस अधीक्षक सागर पाटील व कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, पो. ना. ह्रदय घोडके, पो. कॉ. सागर जंगम यांनी ही कारवाई केली आहे.

जामखेड शहरातील गोळीबाराच्या घटना ताज्या असतानाच शनिवारी (दि. 29) सकाळी अकराच्या दरम्यान बीड रोडवरील फॅशन वर्ल्ड या दुकानासमोर बाळू दादा डोके याच्यावर आरोपी विकास बाबासाहेब थोरात व विशाल मगर हे पांढर्‍या रंगाची बुलेटवर येऊन आपल्याकडील पिस्टलमधून गोळी झाडली.

यात सुदैवाने डोळे यांनी त्यांच्या हाताला झटका दिल्याने पिस्तूल गोळी डोळे याला न लागता ती बाजूला गेल्याने त्याचा जीव वाचला. या घटनेमुळे जामखेड शहरात काही वेळ दहशतीचे वातावरण होते. जामखेड शहरात गोळीबाराच्या वारंवार प्रकार होत असून, पोलीसांचा गुंडांवर वचक राहिला नसल्याची चर्चा शहरात आहे.

जामखेड शहरात दोन वर्षांपूर्वी आडवडे बाजार आसतानाच असाच प्रकारे भरदिवसा झाला होता. यात योगेश राळेभात, राकेश राळेभात या तरुणांची गोळ्या घालून निघृण हत्या झाली होती. काही काळानंतर जामखेड शहरातील वैद्यकीय व्यवसाय करणार्‍या डॉ. सादिक पठाण व नय्युम शेख यांच्यावरही नवीन पंचायत समिती कार्यालयासमोर दिवसा गोळीबार झाला होता. त्यात दोघेही गंभीर जखमी झाले होते.

या घटना विस्मृतीत गेल्या नसतानाच शनिवारी भुतवडा (ता. जामखेड) येथील तरुण बाळु दादा डोके याच्यावर पूर्वीच्या किरकोळ वादावादीच्या कारणावरून सावरगाव (ता. जामखेड) येथील विकास बाबासाहेब थोरात व विशाल मगर यानी गोळी झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. गोळीबारानंतर आरोपी फरार झाले होते. पण पोलिसांनी दोन्ही आरोपीचा शोध घेऊन डोनगाव (ता. जामखेड) येथून त्यांच्या सहा तासाच्या आत मुसक्या आवळल्या.

या संदर्भात बाळु डोके यांच्या फिर्यादीनुसार जामखेड पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद केली आहे. विकास बाबासाहेब थोरात व विशाल मगर यांच्या विरोधात 307 व आर्म अ‍ॅक्ट 325 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर पोलीस अधीक्षक सागर पाटील व पोलीस उपअधीक्षक संजय सातव, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी घटनास्थळास भेट दिली होती.

पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या आदेशानुसार आरोपीच्या तपासासाठी पोलीसांचे तीन पथक केले होते. फिर्यादी डोके व जामखेड शहरातील नागरिकांमध्ये या घटनेने दहशतीचे वातावरण आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, जामखेडचे सहायक पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण करत आहेत.

पोलीस हेड कॉ. बापूसाहेब गव्हाणे, अजिनाथ बडे, गणेश गाडे, अल्ताफ शेख, राठोड यांनीही या कामी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील व सपोनि अवतारसिंग चव्हाण यांनी जामखेड शहरात शांतता राखण्याचे आवाहन केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post