अहमदनगर- नारीशक्तीच्या सन्मानाबरोबरच गरजू समाजघटकांसाठी उपक्रम राबवून गुरुकुल शिक्षक मंडळाने समाजात शिक्षकांची प्रतिष्ठा वाढवली आहे. या मंडळाचा अभिमान वाटतो, असे गौरवोद्गगार पद्मश्री पोपटराव पवार यांनी काढले.
गुरुकुल महिला आघाडीच्या वतीने ६१ शिक्षिकांना गुरुकुल नारीशक्ती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार वितरण कार्यक्रमात पवार बोलत होते. कवी प्रशांत मोरे, सिईओ जगन्नाथ भोर, डॉ . संजय कळमकर, रा. या. औटी, संजय धामणे, नितिन काकडे, सुदर्शन शिंदे, वृषाली कडलग, भास्कर नरसाळे, सिताराम सावंत, दत्ता आरे, वसंत लांडे आदींची उपास्थिती होती.
पवार म्हणाले, बँकेच्या सभेत गोंधळ होतो, त्यामुळे समाजात शिक्षकांविषयी उलटसुलट चर्चा होते. परंतू आज गुरुकुलने आयोजित केलेला हा नारी सन्मानाचा देखणा कार्यक्रम पाहून आपण भारावून गेलो आहोत. असे ते म्हणाले. भोर यांनी सांगितले, इस्रो सहलीसाठी शिक्षक न्यावेत अशी मागणी शिक्षक समितीने केली आहे. या वर्षापासून पाच शिक्षकांना ही संधी दिली जाईल.
लोककवी प्रशांत मोरे यांनी आपल्या पहाडी आवाजात आईच्या कविता सादर केल्या तेंव्हा अनेक महिलांना अश्रू आवरले नाहीत. त्यांच्या गेयकावितांना महिलांनी टाळयांच्या तालात प्रतिसाद दिला. कार्यक्रमास शिक्षिकांची मोठी उपस्थिती होती. महिलांना बसण्यासाठी जागा देऊन अनेक शिक्षक उभे राहून कार्यक्रमाचा आस्वाद घेताना दिसले.
शिक्षकनेते व साहित्यिक डॉ . संजय कळमकर म्हणाले, 'महिलांचा सन्मान करताना पुरुषांनी आपल्या वृत्तीतील पुरुषप्रधान संस्कृती कायमची दूर केली पाहिजे. अर्थात महिलांचे सशक्तीकरण म्हणजे पुरुषांचे अशक्तीकरण नव्हे हेही लक्षात घेतले पाहिजे.
पाथर्डी येथिल आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची मुलगी प्रिती मल्हारी बटूळे ( सातवी) हिला गुरुकुलने पंचवीस हजार रुपयांची मदत दिली. राहूरीचे तालुकाध्यक्ष विठ्ठ्ल वराळे यांनीही पाच हजार रुपये मदत जाहिर केली. प्रितीचे शिक्षक लहू बोराटे यांना गुरुकुलचे आभार मानताना अश्रू आवरले नाहीत.
Post a Comment