स्वतःचे डोके वापरून कुठल्याही औषधी घेऊ नका, डॉक्टरांचा सल्ला घ्या -उपमुख्यमंत्री
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - देशासह आता महाराष्ट्रात सुद्धा कोरोना व्हायरस पोहोचला आहे. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवा आणि मेसेज वाचून घाबरण्याचे काहीच कारण नाही. स्वच्छता ठेवा आणि काळजी घ्या. सर्वात महत्वाचे म्हणजे, कोरोना व्हायरसची लक्षणे दिसून आल्यास कुणीही स्वतःची बुद्धी वापरून औषधे घेऊ नका. कुठलेही औषध घेण्यापूर्वी डॉक्टराचा सल्ला आवश्य घ्या असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
पुण्यात 5 जणांना कोरोना व्हायरसची बाधा झाली आहे. तर नाशिक आणि कोल्हापूरसह बीडमध्ये सुद्धा संशयित रुग्ण सापडले. मुंबईत सापडलेल्या संशयित रुग्णांची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास चिंतेची बाब आहे. याचा अर्थ कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत आहे. "लोकांना माझे आवाहन आहे की घाबरुन जाऊ नका. प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. प्रसारमाध्यमांच्या माध्यमांनी आवाहन केले तशी काळजी घ्या. लोकांच्या थेट संपर्कात येऊ नका आणि खबरदारी घ्या. सोबतच, खोकला किंवा शिंका आल्यानंतर रुमाल वापरणे इत्यादी गोष्टी लक्षात ठेवा." असेही अजित पवारांनी सांगितले आहे.
Post a Comment