महापालिकेची मोठी कारवाई ; बालिकाश्रम रोड परिसरातून प्लास्टिकचा मोठा साठा जप्त


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : बालिकाश्रम रोड परिसरातील एका घरातून महापालिकेच्या पथकाने गुरुवारी (दि.5) कारवाई करत बंदी असलेल्या प्लॅस्टिकचा मोठा साठा जप्त केला आहे. सुमारे तीन टन माल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी मनोज कासलीवाल यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती मुख्य स्वच्छता निरीक्षक राजकुमार सारसर यांनी दिली.

शासनाने सिंगल युज प्लॅस्टिकवर पूर्णपणे बंदी घातलेली आहे. शासनाच्या निर्देशानुसार गेल्या काही महिन्यांपासून मनपाच्या आरोग्य विभागामार्फत प्लॅस्टिक विक्रेत्यांवर व प्लॅस्टिक वापरणार्‍यांवर कारवाई केली जात आहे. तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार प्लॅस्टिक मुक्त महाराष्ट्र अभियानही सध्या कार्यान्वित करण्यात आलेले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून शहरात अनेक ठिकाणी तपासणी सुरू आहे.

गुरुवारी सकाळी बोरुडे मळा परिसरात पंचशील नगर परिसरामध्ये एका घरात प्लॅस्टिकचा मोठा साठा असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकार्‍यांना मिळाली होती. त्यानुसार मुख्य स्वच्छता निरीक्षक राजकुमार सारसर, स्वच्छता निरीक्षक परिक्षित बीडकर, बाळासाहेब विधाते, तुकाराम भांगरे, अविनाश हंस, सुरेश वाघ, राजेंद्र सामल यांच्या पथकाने कासलीवाल यांच्या घरावर छापा मारला. यात तळमजल्यावर व पहिल्या मजल्यावर मोठ्या प्रमाणात बंदी असलेल्या प्लॅस्टिकचा साठा आढळून आला. सारसर यांनी तात्काळ कारवाई करुन प्लॅस्टिकचा साठा जप्त केला आहे. तसेच शासनाच्या आदेशानुसार कासलीवाल यांच्यावर दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post