दरोड्याच्या तयारीतील 6 जणांची टोळी मुद्देमालासह जेरबंद
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- घातक शस्त्रास्त्रे रस्तालुट करण्याच्या किंवा कोठेतरी दरोड्याच्या तयारीत असलेली 6 जणांची टोळी श्रीरामपूर पोलिसांनी शिताफीने पकडली. ही कारवाई बुधवारी (दि.11) मध्यरात्रीच्या सुमारास श्रीरामपूर शहरातून जाणार्या नाशिक रोडवरील ओव्हर ब्रीज जवळ केली.
या कारवाईत किरण जगन्नाथ चिकणे उर्फ बटल्या (वय 24), सागर राजू त्रिभुवन (वय 23, दोघेही रा.कांदा मार्केट पेट्रोल पंपासमोर, भीमनगर, वॉर्ड नं.6), आकाश दिनकर सौदागर (वय 23, रा.सिद्धार्थनगर, वॉर्ड नं.1, श्रीरामपूर), कुरबान इस्माईल शेख (वय 24, रा.वॉर्ड नं.2, श्रीरामपूर), अक्षय हिराचंद त्रिभूवन (वय 22, रा.गोधवणी, वॉर्ड नं.1, श्रीरामपूर), लहू शशिराम निकम (वय 20, रा.जातेगाव, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद) यांना अटक करुन त्यांच्याकडील 1 स्प्लेंडर दुचाकी (क्र.एम.एच.17, सी.ए.5633), 1 तलवार, मिरची पावडर, स्क्रु ड्राईव्हर असा एकूण 35 हजार 950 रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
श्रीरामपूर पोलीस शहर परिसरात रात्रीच्या वेळी गस्त घालीत असताना नेवासा रोडवरील ओव्हर ब्रीज जवळ काही इसम संशयीतरित्या हालचाली करुन दबा धरुन बसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्यांच्यावर छापा टाकून त्यांना शिताफीने अटक केली व त्यांच्याकडील मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी पो.कॉ. धनंजय वाघमारे (श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे) यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 399, 402 भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असून पुढील कारवाई पोलीस उपनिरीक्षक बहाकर हे करीत आहेत.
Post a Comment