राज्यसभेवर कोणाची वर्णी?; निवडणूक एप्रिलमध्ये






माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - राज्यसभेच्या आगामी द्वैवार्षिक निवडणुकीत महाराष्ट्रातील सात जागांवर उमेदवारांच्या निवडीविषयी अनौपचारिक चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रत्येकी एका जागेवर कोणाची वर्णी लागते, भाजपचा तिसरा उमेदवार कोण असेल, तसेच पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या व्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी मिळते, याकडे लक्ष लागलेले आहे. येत्या एप्रिलमध्ये राज्यसभेच्या ५२ जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुका होणार असून त्यात महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक सात जागांचा असेल.
महाराष्ट्र विधानसभेतील २८८ आमदारांना यंदा एप्रिलमध्ये होऊ घातलेल्या राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत सात जागांसाठी मतदान करायचे आहे. सर्वाधिक १०५ आमदार तसेच पाच अपक्ष आमदारांच्या समर्थनासह ११० मते असलेल्या भाजपला तीन जागा जिंकण्याची संधी असेल. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या सत्ताधारी महाविकास आघाडीपाशी १७८ मते असून त्यांना चार जागांवर विजय मिळण्याची खात्री आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभूत झालेले उदयनराजे भोसले यांची नावे भाजपने निश्चित केल्याचे मानले जात आहे. तिसऱ्या उमेदवारासाठी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर किंवा राज्यसभेचे माजी खासदार अजय संचेती यांच्यात चुरस असल्याचे समजते. भाजपचे मावळते खासदार संजय काकडे आणि अमर साबळे हेही इच्छुक असले तरी त्यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे.

शिवसेनेच्या वाट्याला एक जागा येणार असून त्यासाठी मावळते खासदार राजकुमार धूत यांची पुन्हा वर्णी लागण्याची शक्यता नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेल्या प्रियांका चतुर्वेदी या जागेसाठी इच्छुक असून त्या प्रयत्न करीत असल्याचे समजते. मात्र पक्षाच्या जुन्याजाणत्या नेत्यालाच संधी मिळाली पाहिजे, असा शिवसेनेतील नेत्यांचा प्रयत्न असून त्यात अनंत गीते, आनंदराव अडसूळ, चंद्रकांत खैरे आणि शिवाजीराव आढळराव पाटील या पक्षाच्या संसदेतील चार सर्वात ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे सलग दुसऱ्यांदा राज्यसभेवर जाणे निश्चित झाले असून त्यांच्या वाट्याला आलेल्या दुसऱ्या जागेवर कोणाला उमेदवारी मिळते, याविषयी उत्सुकता आहे. पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजीद मेमन निवृत्त होत आहेत.

वासनिक, सातव यांची नावे आघाडीवर

काँग्रेसच्या वाट्याला येणाऱ्या एका जागेसाठी अनेक नावांची चर्चा आहे. मावळते खासदार हुसेन दलवाई पुन्हा इच्छुक आहेत. त्याचबरोबर पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक आणि गुजरात काँग्रेसचे प्रभारी असल्यामुळे लोकसभा निवडणूक न लढलेले राजीव सातव यांची नावे आघाडीवर आहेत. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकांचे चित्र स्पष्ट होणे अपेक्षित आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post