आज रोड शो, गांधी दर्शन, मेगा शो; आज सकाळी 11 नंतर अहमदाबादेत, सायंकाळी ताजमहाल पाहणार ट्रम्प
माय अहमदनगर वेब टीम
​​​​​​नवी दिल्ली - अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सोमवारी आपल्या पहिल्या भारत दौऱ्यावर येत असून दुपारी ते अहमदाबादेत दाखल होतील. सोबत त्यांची पत्नी मेलानिया, मुलगी इवांका, जावई जेरड कुशनर आणि प्रशासनातील १२ वरिष्ठ अधिकारी असतील. हा दौरा अहमदाबादेतून सुरू होणे ही अभिमानाची बाब असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ३६ तासांच्या या दौऱ्यात ट्रम्प विमानतळापासून मोटेरा स्टेडियमपर्यंत २२ किमी अंतराचा रोड शो करतील. दरम्यान, रविवारी सुरक्षा पथकांनी रविवारी १०० वाहनांसह नियोजित रोड शोचा सराव केला. यात २५ आयपीएस अधिकारी सहभागी झाले.

सुरक्षेसाठी १२ हजार पोलिस जवान
अहमदाबादेत १२ हजार जवान तैनात आहेत. रोड शो मार्गावर शेकडो सीसीटीव्ही, नाइट व्हिजन कॅमेरे आहेत. सुरक्षा पथके, पतंग पकडणाऱ्या पथकांसह उंच इमारतींवर शार्पशूटर तैनात आहेत. ट्रम्प-मोदी यांच्या‘नमस्ते मोदी’ कार्यक्रमात १ लाख लोक असतील. दरम्यान, यासाठी मोटेरा स्टेडियमच्या प्रवेशद्वारावर लावलेली स्वागत कमान वाऱ्यामुळे रविवारी पडली. याच कमानीतून व्हीआयपी आत येणार आहेत. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आढावा घेतला.

आजचे नियोजन........

सकाळी 11:40 वा. : अहमदाबाद विमानतळावर शंख-ढोल-ताशांसह स्वागत
ट्रम्प-मेलानियांसाठी १५० फूट लांब रेड कार्पेट, १९ कलाकार करणार दोघांचे स्वागत.
विमानतळावर १ हजार कलाकार पारंपरिक नृत्य करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत ट्रम्प यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला जाईल.

11:50 वा... २२ किमी अंतराचा भव्य रोड शो सुरू होईल
या भव्य रोड शोला “इंडिया रोड शो’ असे नाव देण्यात आले आहे. विमानतळाहून ट्रम्प आणि कुटुंबीय गांधी आश्रमाकडे रवाना होतील.

12.20 वा... गांधी आश्रमात दाखल, दर्शन घेतल्यानंतर साबरमती नदीकिनारी
येथे ट्रम्प यांचे स्वागत सुताच्या हाराने होईल. त्यानंतर ट्रम्प हृदयकुंज वाटिका येथ गांधीजींना श्रद्धांजली अर्पण करून मोटेरा स्टेडियमकडे रवाना होतील.

1.05 वा... स्टेडियममध्ये १ लाखाहून अधिक लोकांसोबत दु. ३ वाजेपर्यंत ट्रम्प-मोदी थांबतील.
मोटेरा स्टेडियममध्ये नागालँड, आसामसह अनेक राज्यांचे कलाकार कला सादर करतील. कैलाश खेर सुफी गीते सादर करतील.
त्यानंतर अमेरिका-भारत संबंधांवर मोदी यांचे स्वागतपर भाषण होईल. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे भाषण होणार आहे.
शेवटी मोदी आणि ट्रम्प कुटुंबीय उघड्या जीपमधून स्टेडियमवर उपस्थित लोकांना अभिवादन करतील.

3:30 वा... ट्रम्प-मेलानिया आग्र्याकडे रवाना
ताजमहाल पाहिल्यानंतर सायं. ६.४५ वा. ट्रम्प दिल्लीकडे रवाना. ७.३० वा. दिल्लीत दाखल. मंगळवारी सकाळी राष्ट्रपतींना भेटतील.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post