पत्नीची हत्या ; मृतदेह पेट्रोलने जाळला


माय अहमदनगर वेब टीम
एकरूखे -  संशयावरून पत्नीच्या डोक्यात लाकडी दांडा मारून जिवे ठार मारले. मृतदेह पोत्यात भरून एकरूखे नपावाडी रोडलगत त्याच्यावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना शनिवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास एकरूखे येथे घडली. दरम्यान, मृतदेह पेटविल्यानंतर आरोपी पती सुनील लेंडे राहाता पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने पत्नीला पेट्रोल टाकून पेटविल्याबाबतची हकीगत पोलिसांना सांगितली. पोलिसांनी आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

राहाता तालुक्यातील एकरूखे येथील सुनील जनार्दन लेंडे यांच्यासोबत श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगाव येथील आप्पासाहेब तरस यांची मुलगी छाया हिचा 2008 साली विवाह झाला. त्यानंतर काही दिवस दोघांचा संसार चागला सुरू होता. त्यांना संसारवेलीवर तीन मुले झाली. त्यानंतर मात्र सुनील पत्नी छाया हिच्या संशय घेऊ लागला. त्यामुळे त्यांच्यात नेहमी वाद होत असे. शनिवारी सायंकाळी छाया ही जनावरांसाठी घास कापत असताना सुनील तेथे गेला.

त्याने तेथे शिवीगाळ केली. नेहमीच्या या वादाला कंटाळलेल्या छायाने त्याला प्रतिकार केला. त्यामुळे संतप्त झालेल्या सुनीलने हातातील लाकडी दांडा छायाच्या डोक्यात मारला. घाव वर्मी बसल्याने छाया जागेवर बेशुध्द झाली. सुनीलच्या ही गोष्ट लक्षात आल्यावर त्याने छायाला तेथेच सोडून जवळच असलेले घर गाठले. घरी असलेले आई, वडील, व मुलांना रूईचे पाहुणे मयत झाल्याचे सांगून तुम्ही ताबडतोब अंत्यविधीला जा. मी छायाला घेऊन येतो, असे सांगितले.

आई, वडील व मुलांना रूईला पाठवून दिल्यानंतर सुनील एकरूखे गावात गेला. त्याने गावात नाष्टा केला. रात्री 9 वाजेच्या सुमारास तो पेट्रोल व पोते घेऊन घराकडे गेला. त्याने घासाच्या शेतात पडलेला छायाचा मृतदेह पोत्यात भरला. मृतदेह मोटारसायकलला बांधून एकरूखे नपावडी रोडला रात्री 9.30 वाजेच्या सुमारस घेऊन आला. रस्त्याच्या कडेला मृतदेह फेकून दिला. मृतदेहावर सोबत आणलेले पेट्रोल ओतून पोत्यासह मृतदेह पेटवून दिला. त्यानंतर सुनीलने मोटारसायकल सुरू केली तो थेट राहाता पोलीस ठाण्यात हजर झाला. वरील सर्व घटना त्याने पोलिसांना सांगितली.

दरम्यान, घटनाक्रम ऐकल्यानंतर राहाता पोलिसांनी छाया हिच्या नातेवाईकांना घटनेची माहिती देत सुनीलला रात्री 12 वाजेच्या दरम्यान घटनास्थळी नेले. तेथे छायाचा 80 टक्के जळालेला मृतदेह ताब्यात घेतला. मयत छाया हिचा भाऊ सुनील आप्पासाहेब तसर (रा. खैरी निमगाव, ता. श्रीरामपूर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान शवविच्छेदनानंतर शोकाकुल वातावरणात छाया हिच्या मृतदेहावर एकरूखे गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने एकरूखे परिसरात हळहळ व्यक्त होत संशयाची बळी ठरलेल्या छाया हिला तीन छोटी मुले आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुभाष भोये करीत आहे

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post