कडकडीत बंद, भव्य दिंडी मोर्चा, बाईक रॅली


माय अहमदनगर वेब टीम
अकोले - अकोले तालुक्याचे सुपुत्र, महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख यांच्या समर्थनार्थ व भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ काल अकोले शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला. अकोले शहरात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इंदोरी या महाराजांच्या मूळ गावापासून मोटारसायकल रॅली काढण्यात आली.त्यात युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सकाळी महात्मा फुले चौकात तालुक्यातील विविध भागातून आलेले वारकरी, महिला आदी अबाल वृद्ध एकत्रित झाले. नंतर टाळ मृदुगाच्या गजरात दिंडी मोर्चा काढण्यात आला. गाडगेबाबा जयंतीच्या दिवशी निवृत्ती महाराज देशमुख यांचे समर्थनार्थ आज अकोलेकरांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

गाडगे बाबांनी आयुष्यभर जे समाज प्रबोधनाचे, अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम केले तेच काम आज निवृत्ती महाराज करत असल्याचे प्रतिपादन ज्येेष्ठ नेते, माजीमंत्री मधुकरराव पिचड यांनी केले. बाजारतळावर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. सभेच्या अध्यक्षस्थानी वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ विष्णू महाराज वाकचौरे होते.

यावेळी बोलताना माजी मंत्री पिचड म्हणाले की, निवृत्ती महाराजांनी आपल्या वक्तव्या बद्दल दिलगिरी व्यक्त केल्यानंतर खरे तर आज हे आंदोलन करण्याची वेळच यायला नको होती, आपला लढा कोणा व्यक्ती विरुद्ध नाही तर प्रवृत्ती विरुद्ध आहे असे ते म्हणाले. निवृत्ती महाराज यांनी आपली कीर्तन सेवा सुरूच ठेवावी, संपूर्ण तालुका त्यांच्या पाठीशी उभा असल्याचे पिचड म्हणाले.

आ.डॉ.किरण लहामटे म्हणाले की-संस्कृती जपण्याचे काम संत, महंतांनी केले आहे तेच काम आज निवृत्ती महाराज करीत आहेत.त्यांची स्वतःची अशी वेगळी भाषा शैली आहे, ते केवळ किर्तनकार नव्हे तर प्रबोधनकार आहेत. ते जे बोलले ते सर्व आयुर्वेदाच्या वैद्यकीय अभ्यासक्रमात असल्याचे त्यांनी सांगितले. समाजात प्रक्षोभ निर्माण करणार्‍या, भावना दुखावणार्‍यांविरुद्ध कायदेशीर कारवाई झाली पाहिजे असे ते म्हणाले.

माजी आमदार वैभवराव पिचड म्हणाले की, नवीन पिढीला अध्यात्मा कडे आणण्याचे काम निवृत्ती महाराजांनी केले आहे. अनिष्ट,रूढी ,परंपरा यांचे विरुद्ध त्यांनी नेहमी आवाज उठविला असून ते खरे समाज सुधारक आहेत.ते केवळ महाराष्ट्र राज्याला भूषण नाही तर देशाला भूषण आहेत.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर म्हणाले, राजकारणी मंडळी अनेक गोष्टी स्पष्टपणे बोलत नाहीत. ते स्पष्टपणे बोलण्याचे काम निवृत्ती महाराज करत आहेत.

ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले यांनी महाराष्ट्र हा साधू संतांचा वारकर्‍यांचा आहे हे आज येथे जमलेल्यानी सिद्ध केले आहे. निवृत्ती महाराजांनी उभी हयात अंधश्रद्धा, स्त्री भ्रूण हत्या,अनिष्ट रूढी परंपरा यांच्या विरोधात आवाज उठविला. ज्ञानोबा, तुकोबांना जे भोगावे लागले तेच आज निवृत्ती महाराजांना भोगावे लागले असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

यावेळी अगस्ती देवस्थानचे अध्यक्ष के. डी. धुमाळ, ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे, मीनानाथ पांडे, शिवाजीराव धुमाळ, अ‍ॅड. वसंतराव मनकर, जालिंदर वाकचौरे, अगस्ती कारखान्याचे संचालक महेशराव नवले, अशोकराव देशमुख, शिवसेनेच्या नेत्या स्मिता अष्टेकर,तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ, हिराबाई आग्रे, इंदूबाई वाकचौरे, क्रांती देशमुख, प्रा. चंद्रभान नवले आदींनी मनोगते व्यक्त केली. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्या वक्तव्यावर अनेकांनी कडक शब्दात टीका केली.

प्रास्तविक दीपक महाराज देशमुख यांनी केले. राजेंद्र महाराज नवले यांनी सूत्रसंचालन केले. योगी केशवबाबा, विष्णू महाराज वाकचौरे आदींच्या हस्ते तहसीलदार मुकेश कांबळे यांना निवेदन देण्यात आले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post