महावितरण व शासनाची दप्तर दिरंगाई विद्यार्थ्यांच्या मुळावर


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर– महावितरण व शासनाच्या निष्काळजीपणामुळे गेल्या आठ महिन्यांपासून भरती प्रक्रिया रखडल्याने महाराष्ट्रातील लाखो आयटीआय धारकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. शासन व महावितरणची दप्तर दिरंगाई विद्यार्थ्यांच्या मुळावर आल्याने लाखो तरुण बेरोजगारीचे जीवन जगत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया विद्यार्थ्यांमध्ये उमटत आहेत.

महाराष्ट्र शासनाने दि. 13 जुलै 2019 रोजी जाहिरात क्रमांक 04 व 05 अन्वये महावितरण कंपनीमध्ये विद्युत सहाय्यक 5000 व उपकेंद्र सहाय्यक पदाकरिता 2000 अशा एकूण 7000 पात्र उमेदवारांच्या अर्जांची मागणी केली होती. त्यानुसार भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील लाखो आयटीआयधारकांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरले व ही जाहिरात निघाल्यापासून 45 दिवसांमध्ये भरती पूर्ण करण्याचे ऊर्जामंत्री यांचे आदेश होते.

परंतु ही जाहिरात निघून अर्ज भरण्याची प्रक्रिया बंद होऊन तब्बल सात ते आठ महिने होऊन देखील कोणतीही अडचण नसताना ही भरती प्रक्रिया शासनाच्या व महावितरणच्या निष्काळजी व दिरंगाईमुळे आजपर्यंत पूर्ण केलेली नाही. ही भरती पूर्ण होत नसल्यामुळे लाखो आयटीआयधारक भरती प्रक्रिया पूर्ण होण्याची गेल्या सात ते आठ महिन्यांपासून वाट पाहत आहेत. परंतु भरती पूर्ण होत नसल्याने आजमितीस लाखो विद्यार्थ्यांवर बेरोजगारीची वेळ आलेली असून त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विलंबामुळे अनेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा निघून जात आहे व त्यांच्यामध्ये निराशेचे वातावरण निर्माण होत आहे.

तसेच अनेक विद्यार्थी बेरोजगार असल्यामुळे त्यांनी उर्जामंत्री व वेगवेगळे मंत्री यांना निवेदनाद्वारे ही भरती तात्काळ पूर्ण करण्याबाबत विनंती केलेली आहे. तरी देखील भरती प्रक्रिया पूर्ण करीत नसल्यामुळे आयटीआयधारक विद्यार्थी महावितरण व शासनाच्या धोरणावर नाराज होत असून शासन व महावितरण यांनी ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण केली नाही तर आयटीआयधारक शासन विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत. प्रकाश गड येथे दि.4 मार्च रोजी आमरण उपोषणास बसणार आहेत. अशी माहिती अमोल वाणी, अनिल कुरकुटे, उध्दव रहाणे, नानाभाऊ आंबेकर, तुषार गाढे यांनी दिली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post