प्लास्टिक कचऱ्यापासून तयार वस्त्र वापरतात थायलंडचे भिक्खू



माय अहमदनगर वेब टीम
 पर्यावरणातील वाढत्या प्लास्टिक प्रदूषणाला आळा घालण्यात थायलंडचे बाैद्ध मंदिर महत्त्वाची भूमिका बजावत आहे. येथील भिक्खू प्लास्टिक कचऱ्याच्या धाग्यांपासून बनलेलेच भगवे वस्त्र ते धारण करीत आहेत. इतकेच नव्हे तरा आपल्या समुदायात याविषयी जागरूकता निर्माण करीत आहेत. बाैद्ध भिक्खूंचे शैक्षणिक केंद्र ठरलेले हे मंदिर आता प्लास्टिक पुनर्प्रक्रियेसाठी प्रसिद्ध झाले आहे. थायलंडची राजधानी बँकाॅकपासून सुमारे ३० किमी अंतरावरील ‘वाट चक डाएंग’ नावाच्या बाैद्ध मंदिरात भिक्खूंना आणि भाविकांमध्ये धार्मिक चर्चेपेक्षाही सर्वाधिक वेळ चर्चा ही पर्यावरण संरक्षणाच्या उपायांवर हाेते. भाविक पैसे आणि अन्नदान करण्यासाठी येथे येतात तेव्हा भिक्खू त्यांच्याकडून एक पिशवी प्लास्टिक कचरादेखील मागून घेतात. यामुळे लाेक बाटल्या आणि अनेक प्रकारचा प्लास्टिक कचरा येथे घेऊन येतात.


मंदिरातील वरिष्ठ भिक्खू ५६ वर्षे वयाचे फ्रा टिपाकाेर्न एरियाे म्हणाले, कशा पद्धतीने पर्यावरण बदलता येऊ शकते हे लाेकांना शिकवणे गरजेचे आहे. या मंदिराला सर्वाधिक प्रसिद्धी मिळते ती भिक्खूंसाठी प्लास्टिकपासून बनवल्या जात असलेल्या वस्त्रांमुळे. आतापर्यंत भिक्खूंनी ४० टन प्लास्टिकवर पुनर्प्रक्रिया केली आहे. तीन वर्षांपूर्वी प्लास्टिकपासून कपडे बनवण्याचा विचार आला हाेता. तेव्हा एक व्यक्ती मंदिरात आली आणि त्याने भिक्खूंना सांगितले की, मी जो शर्ट घातला आहे ताे प्लास्टिकपासून बनवलेला आहे. त्यानंतर आम्ही दान स्वरूपात प्लास्टिक स्वीकारणे सुरू केले. येथे पुनर्प्रक्रिया यंत्र बसवले. घन प्लास्टिकपासून धागा तयार करण्यात आला आणि त्यापासून वस्त्र, त्याची शिलाई अशी सारी कामे स्थानिक लाेकांच्या मदतीने केली जात आहेत, यामुळे अनेकांना राेजगारदेखील मिळताे आहे.

या बाैद्ध मंदिरात वस्त्रनिर्मितीशिवाय प्लास्टिक कचऱ्यापासून पेन्सिल, केस, बूट, नाव आणि प्लास्टिकच्या दुधाच्या बाटल्यांचे छप्परदेखील बनवले जात आहे. इतकेच नव्हे, शेकडाे अनुयायी मंदिरातील पुनर्प्रक्रिया शिकून घेण्यासाठी येतात. चीन, भारत आणि अमेरिकेच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत अतिशय छाेटासा थायलंड पृथ्वीवरून प्लास्टिक हद्दपार करण्याच्या इराद्याने सक्रिय बनलेला जगातील पाचवा देश ठरला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post