जसा तुम्हाला निदर्शनांचा अधिकार, तसाच लोकांना रस्त्यावर चालण्याचा



माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - दिल्लीच्या शाहीनबागेत ६७ दिवसांपासून धरणे देणाऱ्या निदर्शकांचे मन वळवण्यात सुप्रीम कोर्टाने नेमलेले मध्यस्थ वकील संजय हेगडे आणि साधना रामचंद्र अपयशी ठरले. दोघेही बुधवारी सीएएविरुद्ध निदर्शने करणाऱ्यांना भेटले. त्यांनी सर्वात आधी कोर्टाचा आदेश वाचून दाखवला. ते म्हणाले, ‘ज्याप्रमाणे तुम्हाला निदर्शने करण्याचा हक्क आहे, त्याचप्रमाणे लोकांनाही रस्त्यावर चालणे, आपली दुकाने उघडण्याचा अधिकार आहे. सीएएवर सुप्रीम कोर्टात लवकरच सुनावणी होईल. मात्र यामुळे तुमचा आंदोलन करण्याचा हक्क हिरावला जाणार नाही.’

सुमारे २ तासांच्या चर्चेत आम्ही येथून हलणार नाही असे अांदोलकांनी स्पष्ट केले. शेवटी साधना म्हणाल्या, पहिल्या भेटीत सर्वांशी बोलणे होऊ शकले नाही. आम्ही उद्या पुन्हा येणार आहोत. ही चर्चा मीडियासमोर होणार नाही.

तिसरे मध्यस्थ वजाहत चर्चेसाठी गेलेच नाहीत

मध्यस्थांच्या या चमूत माजी मुख्य माहिती आयुक्त वजाहत यांचाही समावेश आहे. मात्र ते चर्चेत नव्हते. दोघेही गेल्यानंतर ते शाहीनबागेत पोहोचले. यावरून चमूमध्ये मतभेद असल्याच्या अटकळी सुरू झाल्या. अथवा हा वेगळ्या डावपेचांचा भाग असू शकतो, अशीही चर्चा रंगली.

मध्यस्थांनी विचारले, रस्ता कसा उघडेल?

रस्ता कसा मोकळा होईल, असा सवाल मध्यस्थांनी केला. त्यावर निदर्शक म्हणाले, ‘जोवर सीएए मागे घेतले जात नाही तोवर आम्ही इंचभरही मागे हलणार नाही. मग आमच्यावर गोळ्यांचा वर्षाही केला तरी बेहत्तर. आम्हाला मारण्याचा प्रयत्न केला जात आहे.’

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post