भारत-अमेरिकेदरम्यान ३ अब्ज डॉलर्सचा संरक्षण करार


माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या बैठकीत संरक्षण करार नेमका कसा होणार आहे या कडे सर्वांचे लक्ष लागले होते.. अखेर, दीर्घ चर्चा आणि वाटाघाटीनंतर ट्रम्प यांनी आज दोन्ही देशांमधील ३ अब्ज डॉलर्सच्या संरक्षण कराराची घोषणा केली. या दरम्यान ट्रम्प यांनी पाकिस्तानबाबत दहशतवादासंदर्भात कडक वक्तव्य केले आहे. पाकिस्तानने चालवलेल्या दहशतवादाला लगाम घालण्याची गरज असल्याचे ट्रम्प म्हणाले. ट्रम्प आणि मोदी या दोन नेत्यांनी दोन्ही देशांमधील मजबूत संबंधांचा यावेळी संदर्भ दिला. हा भारत दौरा आपण कधीही विसरणार नाही, असेही ट्रम्प यांनी आवर्जून सांगितले.

३ अब्ज डॉलर्सचा संरक्षण करार
या करारात अमेरिकेकडून २४ एमएच६० रोमियो हेलिकॉप्टरची २.६ अब्ज अमेरिकी डॉलर्स इतक्या किंमतीत खरेदी करण्यात येणार आहे. आणखी एक करार हा सहा एएच ६४ई अपाचे हेलिकॉप्टरबाबतचा आहे. या करारांतर्गत ८० कोटी डॉलर्सची खरेदी करण्यात येणार आहे. ३ अब्ज डॉलर्सहून अधिकच्या या संरक्षण करारामुळे दोन्ही देशांदरम्यानचे संबंध अधिक मजबूत होतील, असा विश्वास ट्रम्प यांनी यावेळी व्यक्त केला.

अमेरिकेशी भारताची भागीदारी महत्त्वाची- मोदी
आम्ही भारत आणि अमेरिका भागीदारीबाबतच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. यात संरक्षण आणि सुरक्षेचा समावेश आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी माहिती देताना सांगितले. आम्ही ऊर्जा धोरणात्मक भागीदारी, व्यापार आणि पिपल-टू-पिपल अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केल्याचे मोदी म्हणाले. संरक्षण क्षेत्रामध्ये भारत-अमेरिकेदरम्यान मजबूत होत असलेले संबंध आमच्या भागीदारीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, असेही मोदी म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post