गुरुवारी अहमदनगरमध्ये विद्यार्थी साहित्य संमेलन


ल.म.कडू संमेलनाध्यक्ष व नरेंद्रजी फिरोदिया स्वागताध्यक्ष पदी

माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर :- महाराष्ट्र साहित्य परिषद, सावेडी उपनगर शाखा व शांतिकुमारजी फिरोदिया मेमोरिअल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी राजभाषा दिनानिमित्त गुरुवार दि २७ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ९:३० वा. नंदनवन लॉन्स, न्यू टिळक रोड अहमदनगर येथे एक दिवसीय विद्यार्थी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती या संमेलनाचे स्वागताध्यक्ष व मसाप सावेडी उपनगर शाखेचे अध्यक्ष नरेंद्रजी फिरोदिया यांनी दिली.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा व मराठी भाषा अधिक समृद्ध व्हावी यासाठी मराठी राजभाषा दिनाचे आवचित्य साधून आपल्या शहरात प्रथमच विद्यार्थी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

जेष्ठ बालसाहित्यिक व साहित्य अकादमी पुरस्कार विजेते ल. म. कडू यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणाऱ्या या विद्यार्थी साहित्य संमेलनात आ. संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, श्रीमती आशाताई फिरोदिया, जिल्हा पोलिस उप अधिक्षक संदिप मिटके, मनपा उपआयुक्त डॉ. प्रदीप पठारे, साहित्यिक प्रा. सु. प्र. कुलकर्णी, डॉ. संजय कळमकर, प्रा. शशिकांत शिंदे, शिक्षणाधिकारी दिलीप थोरे, रमाकांत काटमोरे, सुभाष पवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

ग्रंथ पूजन, उदघाटन, लेखक तुमच्या भेटीला, बालनाट्य सर्धेच्या अंतिम फेरीत अभिनयाचे रौप्यपदक मिळविणारी अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावची पहिली विद्यार्थिनी कलावंत मुग्धा घेवरीकर ही 'पिंटी' या शेतकऱ्यांच्या मुलींचे भावविश्व साकारणारे एकपात्री प्रयोग सादर करणार आहेत. सोशल मिडीयाच्या माध्यमातून राज्यभर सुंदर हस्ताक्षरासाठी कौतुक झालेली राहुरीच्या जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता ३ री तील विद्यार्थिनी श्रेया गोरक्षनाथ सजन हिचा या संमेलनात विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

विविध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे कविता व कथाकथनाचे सादरीकरण, बक्षीस वितरण व समारोप अशा भरगच्च साहित्य मेजवानीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मसाप सावेडी उपनगर शाखेचे प्रमुख कार्यवाह व संमेलनाचे संयोजक जयंत येलूलकर यांनी दिली.

विद्यार्थी साहित्य संमेलनानिमित्त विविध शाळेमधून इयत्ता ५ वी ते ७ वी व इयत्ता ७ वी ते १० वी या दोन गटात कथाकथन, निबंध लेखन व काव्यवाचन या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. विजेत्या स्पर्धांकांना या संमेलनात मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.

विदयार्थी साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी मसाप सावेडी उपनगर शाखेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांच्या नेतृत्वाखाली व मनपा शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी सुभाष पवार यांच्या सहकार्याने मनपा शिक्षण विभागाचे पर्यवेक्षक जे.एन.पठाण, समन्वयक अरुण पालवे, शारदा होशिंग, स्नेहल उपाध्ये, अरुण पवार, दिपाली देऊतकर, कार्तिक नायर, अनिरुद्ध तिडके आदी परिश्रम घेत आहेत.

स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र व विद्यार्थ्यांना विविध साहित्यिकांच्या पुस्तक खरेदीवर २५ ते ३० टक्के सुट श्रीपाद ग्रंथ भांडार शनी चौक येथे या संमेलनानिमित्त देण्यात येणार आहे.

या संमेलनात विविध शाळेतील विद्यार्थी, साहित्यिक, साहित्य प्रेमी मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन स्वागताध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, मनपा शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी सुभाष पवार, मसाप सावेडी उपनगर शाखेचे प्रमुख कार्यवाह जयंत येलूलकर यांनी केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post