मातृभाषेतून शिक्षण घेऊनही रोजगाराच्या संधी उपलब्ध


मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात मान्यवरांचा सूर
माय अहमदनगर वेब टीम
शिर्डी :- मराठी भाषेविषयीची अनास्था दूर करुन त्याच्या संवर्धनासाठी जाणीवपूर्वक मराठीतूनच बोलले पाहिजे तसेच मातृभाषेतून शिक्षण घेऊनही रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, याची माहिती युवा वर्गापर्यंत पोहोचण्याची गरज आहे, असा सूर मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कोपरगाव येथील कार्यक्रमात व्यक्त झाला.

निमित्त होते, श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्टस् अॅन्ड संजीवनी कॉमर्स कॉलेज, सूर्यतेज संस्था आणि जिल्हा माहिती कार्यालय, अहमदनगर यांच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे आकाशवाणी, पुणेच्या वृत्तनिवेदिका स्वाती महाळंक, राज्य शासनाच्या कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्काराच्या प्रथम मानकरी कवयित्री व सामाजिक कार्यकर्त्या बेबीताई गायकवाड या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्यात्या म्हणून उपस्थित होत्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर थोपटे अध्यक्षस्थानी होते. प्र. जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण, सूर्यतेज संस्थेचे संस्थापक सुशांत घोडके, महाविद्यालयाचे मराठी भाषा विभाग प्रमुख प्रा. डॉ. बाबासाहेब शेंडगे आणि बजाज कंपनीचे तंत्रज्ञ दर्शन धामणकर, सौ.छाया थोपटे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कर्मवीर भाऊराव पाटील आणि लक्ष्मीबाई भाऊराव पाटील आणि कुसुमाग्रजांच्या प्रतिमेस अभिवादन करुन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. रयत शिक्षण संस्थेचे गीत आणि मराठी अभिमान गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्रीमती महाळंक म्हणाल्या, आपण सर्वांनी मराठी भाषेचा अभिमान बाळगायला हवा. हजारो वर्षे जुनी असणारी मराठी आजही टिकून आहे. मराठीविषयी असणारी अनास्था दूर करुन मराठी भाषेला रोजगाराभिमुख असलेली भाषा अशी ओळख मिळवून देणे गरजेचे आहे. मराठी भाषेत शिक्षण घेऊनही या संधी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. निवेदन, रेडीओ जॉकी, दृक-श्राव्य माध्यमे, डिजीटल मीडिया आणि सोशल मीडिया, त्याचबरोबर अनुवादक आणि भाषांतरकार, जाहिरात अशा विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी ही माहिती घेतली पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

अनेक महान व्यक्तीमत्वांनी त्यांच्या वाटचालीत मातृभाषेचे योगदान नमूद केले आहे. त्यामुळे मातृभाषेला गौण स्थान न देता त्यातून शिक्षण घेतले तरी आपण यशस्वी होऊ शकतो, हा आत्मविश्वास अंगी बाळगण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

कवयित्री व सामाजिक कार्यकर्त्या बेबीताई गायकवाड यांनी त्यांच्या संघर्षमय वाटचालीचा प्रवास विद्यार्थ्यांसमोर उलगडला, तेव्हा उपस्थित विद्यार्थ्यांसह मान्यवरांनीही त्यांच्या या संघर्षाला टाळ्यांच्या गजरात सलाम केला. भाजीपाला विक्रीपासून सुरु झालेला प्रवास साहित्याची आवड आणि ओढीने राज्य व देशपातळीवर घेऊन गेल्याचे त्या म्हणाल्या. त्यामुळे परिस्थितीला गौण न समजता आवडीच्या क्षेत्रात काम करीत गेले, तर यश मिळतेच, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. राज्य शासनाने पहिला कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार दिला, ही कामाची पोचपावती असल्याचे त्या म्हणाल्या.

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. थोपटे यांनी, महाविद्यालयास मराठी भाषा गौरव दिनानिमित्त अशा प्रकारचा उपक्रम राबविताना आनंद होत असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी महाविद्यालय स्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. राज्य शासनाच्या विविध विभागांशी समन्वय साधून विद्यार्थी हिताचे कार्यक्रम यापुढील काळातही घेतले जातील, अशी माहिती त्यांनी दिली.

प्रास्ताविकात श्री. चव्हाण यांनी मराठी भाषा गौरव दिन आयोजनामागील भूमिका विशद केली. कविश्रेष्ठ वि.वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये महत्वाचे योगदान दिले. वि. स. खांडेकरांनंतर मराठी साहित्याला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून देणारे कुसुमाग्रज हे दुसरे महान साहित्यिक. त्यांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून त्यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून राज्य शासनाच्या वतीने साजरा करण्यात येतो. या महाविद्यालयात मराठी भाषाविषयक उपक्रमाला विद्यार्थ्यांनी दिलेला प्रतिसाद कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाने काढलेल्या कविश्रेष्ठ कुसुमाग्रजावरील भित्तीपत्रकाचे अनावरण करण्यात आले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या लोकराज्य मासिकाच्या मराठी भाषा विशेषांकाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते झाले.

यावेळी मराठी भाषेचे शिक्षक प्रा.रमेश गायकवाड, प्रा.सुरेश गोरे, प्रा.संदीप वदक, ग्रंथपाल महेश थोरात, योगेश कोळगे, डॉ. महाले, प्रा.वाघ, प्रा.रोहम, प्रा.वैद्य, प्रा.दहे, प्रा.आहेर, प्रा.घोटेकर, प्रा.कानडे, प्रा.देशमुख, कु.भावना गांधिले आदींचा प्रमाणपत्र आणि लोकराज्य मासिक देऊन सत्कार करण्यात आला. स्वागत व पाहुण्यांचा परिचय डॉ. बाबासाहेब शेंडगे यांनी केले. सुत्रसंचालन प्रा.छाया शिंदे, प्रा.सुशिला ठाणगे यांनी केले तर आभार सूर्यतेज संस्थापक सुशांत घोडके यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वितेसाठी महाविद्यालयातील मराठी भाषा विभागाचे शिक्षक व कर्मचारी, सूर्यतेज संस्थेचे सहकारी , जिल्हा माहिती कार्यालयातील जालिंदर कराळे, धनंजय जगताप आदींनी परिश्रम घेतले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post