कोरोनाचा चीनमध्ये हाहाकार; जपानच्या क्रूझवरील रुग्णांच्या संख्येत वाढ










माय अहमदनगर वेब टीम

टोकियो: करोना विषाणूने (कोविड-१९) चीनमध्ये हाहाकार माजवला आहे. त्यातच जपानच्या क्रूझवरही करोनाचा संसर्ग झाल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. या क्रूझवर असणाऱ्या करोना विषाणूग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.

करोना व्हायरसग्रस्त 'डायमंड प्रिंसेज' क्रूझ सध्या जपानच्या योकोहामा किनाऱ्यावर आहे. क्रूझमध्ये ३५०० प्रवाशांसह ३७११ जण आहेत. प्रवासी व कर्मचाऱ्यांमध्ये भारतीय नागरिकांचा समावेश आहे. या क्रूझवर आता नवीन ३९ रुग्ण आढळले आहेत. जपानचे आरोग्यमंत्री कतसुनोबु काटो यांनी बुधवारी याबाबत ही माहिती दिली. आतापर्यंत या क्रूझवर १७४ जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. चौघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

या क्रूझवर असलेल्या काही अधिकाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. या क्रूझवर ३७११ जण मागील एक आठवड्यापासून करोनामुळे बंदिस्त झाले आहेत. हाँगकाँगवरून क्रूझवर आलेल्या एका प्रवाशांत पहिल्यांदा करोना व्हायरसची लक्षणे आढळली होती. सध्या या क्रूझवर एकूण १३८ भारतीय प्रवासी आहेत. भारतीय दूतावास जपान सरकारच्या संपर्कात आहे. सध्या तरी कोणत्याही भारतीय नागरिकाला करोनाची बाधा झाली नसल्याचे समोर आले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post