धार्मिक कार्यक्रमाच्या पत्रिकेवरुन 'या' गावात झाला तुफान राडा


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- सप्ताह कार्यक्रमाच्या पत्रिकेत नावे टाकली नाहीत तसेच नाव नसलेल्या पत्रिका का वाटप केल्या? अशी विचारणा करुन 18 ते 20 जणांच्या जमावाने पासष्ट वर्षिय वृद्धास तलवार, लोखंडी पाईप, लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि.17) सकाळी 9.45 वाजता शिराढोण येथील माळवाडी मधील महादेव मंदिराजवळ घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, नगर तालुक्यातील शिराढोण परिसरातील माळवाडी येथे महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाच्या पत्रिका रामदास छबुराव वाघ (वय 65, रा.माळवाडी, शिराढोण) यांनी वाटल्या. त्यानंतर दादा उर्फ गहिनीनाथ किसन दरेकर, सोनू उर्फ सुनील राजेंद्र दरेकर, किशोर माणिक रोहोकले, रमेश भाऊ वारे (सर्व रा.नगर), गजानन भांडवलकर (रा.वाकोडी फाटा), अक्षय भिंगारदिवे (रा.दरेवाडी) व इतर 15 ते 20 अनोळखी इसमांनी वाघ यांना आमचे नावाने छापलेल्या पत्रिका का वाटल्या नाहीत तसेच नवीन छापलेल्या सप्ताह पत्रिका आमचे नावे का टाकल्या नाहीत? असे म्हणून शिवीगाळ करीत तलवार व पाईपाने त्यांच्या पायावर मारुन लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्याचा पुतण्या परसराम अशोक वाघ याच्या हॉटेलमधील सामानाची तोडफोड करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी रामदास वाघ यांच्या फिर्यादीवरुन नगर तालुका पोलिसांनी भा.दं.वि.क. 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 506, 427 आर्म अॅक्ट 4/25 प्रमाणे मारहाणीच्या गुन्ह्याची नोंद केली असून पुढील कारवाई हे.कॉ. गांगर्डे हे करीत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post