जिल्ह्यातील रस्ते विकासासाठी लवकरच सर्वांगीण आराखडा - पालकमंत्री हसन मुश्रीफ



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : राज्य विधीमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी यांची बैठक घेऊन आढावा घेतला. जिल्ह्यातील रस्ते विकासासाठी सर्वांगीण आराखडा लवकरच तयार केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात झालेल्या या बैठकीस नगरविकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे, महापौर बाबासाहेब वाकळे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, अपर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे, प्र. जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, निवासी उपजिल्हाधिकारी उदय किसवे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.

याशिवाय, आमदार डॉ. सुधीर तांबे, आ. बबनराव पाचपुते, आ. संग्राम जगताप, आ.आशुतोष काळे, आ. लहू कानडे यांची बैठकीस उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हा विकासासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करुन शंभर कोटी अधिकचा निधी आपण मिळवला आहे. नगर शहरातील ऐतिहासिक वास्तुंचे संवर्धन व संरक्षण, नवे विश्रामगृह, शाळा खोल्यांच्या बांधकामासाठी निधी, रस्ते विकास आदींसाठी आपण निधी उपयोगात आणत आहोत. त्याचबरोबर महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत 2 लाख 58 हजार 787 इतक्या सर्वाधीक शेतकर्‍यांना लाभ देणारा आपला जिल्हा असणार आहे. कर्जमुक्तीची ही रक्कम 2296 कोटी 54 लाख इतकी असणार आहे. विहीत मुदतीत आधार प्रमाणीकरण करण्‍यात येईल. अहमदनगर जिल्‍हयातील ब्राम्‍हणी (ता. राहुरी)आणि जखणगांव (ता. नगर) या दोन गावांतील विविध कार्यकारी सेवा संस्थांची यासाठी निवड झाली असल्याची माहिती त्यांनी दिली.

राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी शिवभोजन केंद्रांनाही चांगला प्रतिसाद मिळत असून जिल्ह्यात आणखी पाच केंद्रे वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील केंद्रांतून आता दररोज 1400 शिवभोजन थाळी देण्यात येणार आहेत. आतापर्यंत 18 हजार 121 जणांनी 26 दिवसांत या योजनेचा लाभ घेतल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा विकासासाठी जे जे प्रयत्न आवश्यक आहेत. ते सर्व केले जातील, असे त्यांनी नमूद केले. यावेळी विविध लोकप्रतिनिधींनी शहरातील रस्ते, पर्यटन विकास, पाणीपुरवठा योजना, ग्रामीण भागातील बिबट्यांच्या वाढता वावर, गौण खनिज, गावठाण विस्तारीकरण, सौरऊर्जा प्रकल्प आदींबाबत मुद्दे मांडले.

पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, ग्रामीण भागात बिबट्यांचा वाढता वावर आणि त्यांचे लोकवस्तीत येणे यावर प्रतिबंधासाठी उपाययोजना वन विभागाने कराव्यात. त्यासाठी अधिकचे पिंजरे घेण्यात यावेत.

शाळा खोल्यांच्या दुरुस्ती आणि बांधकामासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. जिल्हा नियोजनचा निधी, आमदार व खासदार निधी आणि श्री साईबाबा विश्वस्त संस्थानने दिलेला निधी यातून उत्तमप्रकारे हे काम होऊ शकेल, असे त्यांनी नमूद केले. वाढत्या वाळूचोरी तसेच अवैध गुटखा प्रकरणी कडक कार्यवाहीचे निर्देश त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले.

नगर शहर सुंदर करण्याच्या दृष्टीने शहरात जागा उपलब्ध असेल तेथे वृक्षलागवड करण्याच्या तसेच शहर स्वच्छ ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

जिल्ह्यातील जे प्रश्न राज्य स्तरावरील आहेत, त्यासंदर्भात संबंधित लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांना घेऊन मुंबईत संबंधित मंत्रीमहोदयांशी चर्चा करुन प्रश्न मार्गी लावण्यात येतील, असे त्यांनी नमूद केले.

या बैठकीस विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post