भारतीय प्रजातीच्या वृक्षांमुळे शहर नंदनवन होण्यास मदत : सभागृह नेते स्वप्निल शिंदे


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : शहराच्या विकास कामाबरोबरच सुंदरतेत भर घालण्यासाठी वृक्षारोपणाची खरी गरज आहे. महापालिकेच्या शहरातील खुल्या जागेवर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणार आहे. सध्या आपल्यासमोर पर्यावरणाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे वातावरणाच्या बदलामुळे मनुष्य जीवनावर विपरित परिणाम होत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व तापमान कमी करण्यासाठी तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी, वृद्धांना फिरण्यासाठी अर्बन फॉरेस्ट या संकल्पनेतून शहरामध्ये जंगल तयार करण्याचे काम सुरु आहे. वृक्षारोपण व त्याचे संवर्धन महत्त्वाचे आहे. यासाठी महापालिकेच्या माध्यमातून शहरामध्ये मोठ्या प्रमाणात उद्यान निर्माण करण्याचे काम सुरु आहे, असे प्रतिपादन सभागृह नेते स्वप्निल शिंदे यांनी केले.

प्रभाग क्र. ४ मध्ये नंदनवन कॉलनी, आसरा सोसायटी, मधुबन कॉलनी, गोविंदपुरा उद्यान, चैतन्यनगर परिसरामध्ये उद्यान निर्मितीचे काम सुरु असून, त्याची पाहणी करताना मनपा सभागृह नेते स्वप्निल शिंदे, नगरसेविका शोभाताई बोरकर, नगरसेवक योगिराज गाडे, अमोल गाडे, अमित गटणे, सचिन जगताप, संजय दळे पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना नगरसेविका शोभाताई बोरकर म्हणाल्या की, कॉलनी अंतर्गत खुल्या जागेवर भारतीय वंशाचे झाडे लावल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पशुपक्षी, फुलपाखरे येण्यास मदत होते. या ठिकाणी फळझाडे, फुलझाडे लावल्यामुळे त्या कॉलनीच्या सुशोभिकरणात भर पडली आहे. या माध्यमातून वृक्षारोपण व संवर्धन तसेच जनजागृती ही लोकचळवळ व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. शहरामध्ये २४ कॉलनी अंतर्गत उद्यान निर्मितीचे काम झाले आहे. यापुढील काळातही मोठ्या प्रमाणात शहरामध्ये ठिकठिकाणी वृक्षारोपण करणार आहे. केवळ प्रसिद्धी करता वृक्षारोपण कार्यक्रमांचे भव्य आयोजन करुन, भरमसाट झाडे लावून त्याचा पर्यावरणासाठी काहीही उपयोग होणार नाही. अशा कार्यक्रमांमधून किती झाडे लावली, याला महत्त्व नसून लावलेल्या रोपांपैकी किती जगले, किती रोपांचे व्यवस्थित संगोपन झाले, किती रोपांची पूर्ण वाढ झाली, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्यामुळे आता पर्यावरण प्रेमींनी शहरात नवीन झाडे लावण्यापेक्षा यापूर्वी लावलेल्या झाडांच्या संवर्धनाचे काम हाती घेणे आवश्यक आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post