शिर्डी – साई जन्मभूमी वादाबाबत शिर्डीकरांच्या शिर्डी कडकडीत बंदची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असून आज सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या वादावर चर्चा करण्यासाठी निमंत्रण दिल्याने काल मध्यरात्रीपासून बेमुदत बंद मागे घेण्याचा निर्णय सर्व ग्रामस्थांनी घेतला असल्याचे माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांनी जाहीर केले. या बैठकीतील चर्चेत समाधान झाले नाही तर पुन्हा आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आज काय तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, शिर्डी ग्रामस्थांच्यावतीने द्वारकामाई समोर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, माजी खा.सदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी नगराध्यक्ष कैलास बापू कोते, ज्येष्ठ ग्रामस्थ ज्ञानेश्वर गोंदकर, साईनिर्माणचे अध्यक्ष विजय कोते, गौतम बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब कोते, उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन, शिवसेनेचे नेते कमलाकर कोते, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, ज्येेष्ठ नगरसेवक अभय शेळके, नगरसेवक शिवाजी गोंदकर, नगरसेवक अशोक गोंदकर नगरसेवक जगन्नाथ गोंदकर, नगरसेवक सुजित गोंदकर, माजी विश्वस्त सचिन तांबे, अशोक कोते, शिवसेना तालुकाप्रमुख संजय शिंदे, सामाजिक कार्यकर्ते नितीन कोते, भाजपचे रवींद्र गोंदकर, माजी उपनगराध्यक्ष विजय जगताप, राष्ट्रवादीचे नीलेश कोते, सुधाकर शिंदे, दिलीप संकलेचा, मनसेचे नगरसेवक दत्तात्रय कोते, विलास आबा कोते, सुनील गोंदकर, प्रमोद गोंदकर, गणेश दिनूमामा कोते, विकास गोंदकर, सचिन शिंदे, सर्जेराव कोते आदींसह मोठ्या संख्येने शिर्डी तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी खासदार सदाशिव लोखंडे यांनी सांगितले की 17 दिवसांत खासदार झालो आहे. साई जन्मभूमी वादाबाबत शिर्डी ग्रामस्थांनी कडकडीत बंद ठेवला असून या बंदला माझे समर्थन देण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. साईबाबा 14 वर्षाचे असताना शिर्डीत आले होते, बाबा सर्व धर्माचे आहे. संतांना कोणताही जात-धर्म नसतो, ज्या भागात ते वास्तव्य करतात ती भूमी त्यांची होते. पाथरी येथे विकास करण्याला विरोध नाही, मात्र साईजन्मस्थळाचा उल्लेख करू नये यासाठी मी शिर्डी ग्रामस्थांच्या भूमिकेबरोबर आहे.
साईबाबांनी कधीही जात-धर्म जन्मस्थळ याबाबत सांगितले नव्हते, ही आमची प्रमुख मागणी राहणार असल्याचे सांगून बाबांच्या सर्वधर्म समभाव बट्टा लागू नये यासाठी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी जाणार आहे. मी साईभक्त म्हणून गावकर्यांसोबत पहिला नंतर खासदार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा बंद मागे घेण्याची विनंती केली असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी नगराध्यक्ष कैलास कोते म्हणाले की, शिर्डीच्या कडकडीत बंदची राज्य शासनाने दखल घेतली असून मध्यरात्री बारा वाजेपासून बेमुदत बंद मागे घेण्यात येणार आहे. आज दुपारी दोन वाजता तालुक्याचे भाग्यविधाते आ. राधाकृष्ण विखे पाटील तसेच खा. सदाशिव लोखंडे यांना बरोबर घेऊन शिर्डी ग्रामस्थांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून या वादावर मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भविष्यात पुन्हा असा उपस्थित होणार नाही अशी मागणी सर्वांच्या वतीने शासनाकडे करण्यात येणार असल्याचे कोते यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्र्यांनी याविषयी सकारात्मक भूमिका न घेतल्यास पुन्हा पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचे सांगून शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने हा बंद मागे घेण्यात आला असल्याचे त्यांनी सर्वानुमते जाहीर केले.यावेळी अशोक कोते, प्रमोद गोंदकर, मंगेश त्रिभुवन आदी ग्रामस्थांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.बंद मागे घेताच शिर्डीत दुकाने उघडायला रात्री उशिरा सुरवात झाल्याने साईभक्तांनी आनंद व्यक्त केला.

Post a Comment