घारगाव – पुणे-नाशिक महामार्गावरील घारगाव शिवारात हॉटेल प्राईड बिअरबारवर रविवारी (19 जानेवारी) पहाटे अज्ञात चोरट्यांनी जबरी चोरी करत मालक आशिष चंद्रकांत कानडे (वय-35 रा. कळंब, ता. आंबेगाव जि. पुणे) यांच्या डोक्यात धारदार हत्याराने मारून त्यांचा खून केला. चोरट्यांनी गल्ल्यातील 40 हजार रुपये रोख रक्कम व विदेशी दारू लुटून पोबारा केला. या घटनेने घारगाव परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले.
याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आशिष कानडे आणि धनंजय दत्तात्रय भालेराव यांनी घारगाव येथील हॉटेल प्राईड हॉटेल व बियरबार चालवण्यासाठी घेतले आहे. भालेराव हे दिवसभर थांबतात. तर रात्रीच्या वेळी कानडे हे हॉटेलमध्ये मुक्काम करत असे. शनिवारी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास हॉटेल बंद करून कानडे काऊंटर शेजारी खाट टाकून झोपले. रविवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी हॉटेलच्या पाठीमागील लोखंडी जाळीच्या दरवाजाच्या कुलूपाची साखळी तोडून हॉटेलमध्ये प्रवेश केला. दरम्यान कांऊटर शेजारी झोपलेले कानडे यांच्या डोक्यावर काही तरी धारदार हत्याराने मारून त्यांचा खून केला. गल्ल्यातील रोख रक्कम 40 हजार रूपयांसह 1950 रुपये किंमतीच्या 15 विदेशी दारूच्या बाटल्या चोरून चोरट्यांनी पोबारा केला.
सकाळी हॉटेल कामगार सुनिल बळीराम पवार नेहमीप्रमाणे भांडे घासून झाल्यानंतर कानवडे यांना झोपेतून उठवण्यासाठी 9 वाजेच्या सुमारास गेले. कानवडे यांच्या अंगावरील पांघरून काढले असता ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. घटनेची माहिती घारगाव पोलिसांना देण्यात आली. माहिती समजताच पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांच्यासह पोलीस हेड कॉन्स्टेबल आदिनाथ गांधले, सुरेश टकले, रघुनाथ खेडकर, संतोष खैरे, राजेंद्र लांघे, किशोर लाड आदींनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती अहमदनगर प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील, श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधिक्षीका डॉ. दिपाली काळे, पोलीस उपअधीक्षक रोशन पंडीत यांना देण्यात आली. त्यांनीही दुपारी घटनास्थळी धाव घेत हॉटेल प्राईडची पाहणी केली. नगर येथून ठसे तज्ज्ञांचे पथक आणि श्वानपथक घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते.
दरम्यान घारगाव परिसरात चोरट्यांनी इतरही सहा ते सात ठिकाणी घरफोड्या करण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी अधिकार्यांनी भेटी घेत नागरिकांकडून माहिती घेतली. चोरट्यांनी खून करत सहा ते सात ठिकाणी घरफोड्या करण्याचा प्रयत्न केल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी हॉटेल प्राईडचे कामगार सुनील बळीराम पवार यांनी दिलेल्या फिर्यादी वरून घारगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 24/2020 नुसार भारतीय दंड संहिता 302, 397, 394, 451 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे हे करत आहे.
घारगाव परिसरात खून आणि घरफोड्या झाल्याची माहिती समजताच अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी घटनास्थळी भेट घेत परिस्थिती समजून घेत नागरिकांना धीर दिला. यावेळी आमदार लहामटे यांनी प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांची भेट घेत तपास लवकर लावण्याची मागणी केली. घारगाव पोलीस ठाण्याच्या परिसरात मागील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात चोर्या झाल्या असून पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांची तक्रार सोमवारी होणार्या बैठकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


Post a Comment