अखेर स्वीकृत नियुक्तीसाठी सभेला मुहूर्त सापडला
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – सुमारे वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर अखेर महापालिकेत पाच स्वीकृत सदस्य नियुक्तीसाठी सर्वसाधारण सभा निश्चित करण्यात आली. शुक्रवार दि. 10 जानेवारीला सकाळी 11 वाजता ही सभा होत आहे.
महापालिकेच्या सार्वजनिक निवडणुकीनंतर महापौरांची निवड केली जाते. या निवडीनंतर होणार्या पहिल्याच सभेत स्वीकृत सदस्यांची नियुक्ती करणे बंधनकारक असल्याचे महापालिका अधिनियमात म्हटले आहे. 31 डिसेंबर 2018 ला महापौरपदाची निवड झाली. त्यानंतर आजपर्यंत म्हणजे वर्षभरात अनेक सभा झाल्या. मात्र स्वीकृत सदस्य नियुक्तीसाठी सभा घेण्याचे टाळले जात होते. वारंवार या विषयावर बोलणेही टाळले जात होते.
महापौर बाबासाहेब वाकळे यांना याबाबत विचारणा केल्यानंतर लवकरच सभा घेऊन स्वीकृतची निवड करू, असे सांगून वेळ मारून नेली जात होती. नगरसचिवांनीही विचारणा केल्यानंतरही, ‘थांबा, बघू’ असे सांगून त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. गेल्या काही दिवसांपासून महापौर वाकळे यांच्या अंगात शिस्तीचे वारे घुमू लागले आहेत. ठेकेदार, कर्मचारी, विभागप्रमुख यांना शिस्त लावण्यासाठी ते दररोज बैठका घेऊन नवनवीन आदेश देऊ लागले आहेत
विविध नगरसेवकांनी व पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही यावर महापौरांकडे विचारणा केली. स्वीकृत सदस्य नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या इच्छुकांनीही आग्रह धरला. काल दिवसभरातील हालचालीनंतर अखेर स्वीकृतसाठी सभा घेण्याचे निश्चित करण्यात आले. स्वीकृतसाठी संख्याबळानुसार शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन आणि भाजपचा एक सदस्य नियुक्त होऊ शकतो.
जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत शिवसेनेत पडलेल्या फुटीचा नेमका कोणाला फायदा होईल, हे सांगतता येणार नाही. मात्र त्यासाठी अनेकजण पाण्यात देव घालून बसले आहेत. महापालिकेत राष्ट्रवादी आणि भाजप यांची आघाडी आहे. महापौरांनी स्वीकृतच्या सभेसाठी अजेंडा काढण्यापूर्वी या दोन्ही पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केल्याचे समजते. त्यानुसार शुक्रवार दि. 10 जानेवारीला सकाळी अकरा वाजता विषेष सभा घेण्यात येणार आहे.
Post a Comment