महिला लिपिक लाच घेताना जाळ्यात



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – तक्रारदाराला जिल्हा रुग्णालयात शासकीय सेवेमध्ये नियमित करण्यासाठी त्याच्याकडून आठ हजार रुपयांची लाचेची मागणी करत, ती स्वीकारताना जिल्हा रुग्णालयातील कनिष्ठ महिला लिपिकाला लाचलुचपतविरोधी पथकाने रंगेहाथ पकडले. शिल्पा राजेंद्र रेलकर (वय-41) असे पकडलेल्या महिला लिपिकाचे नाव आहे.

तक्रारदार जिल्हा रुग्णालयात नोकरीला असून त्यांचा परिविक्षाधीन कालावधी पूर्ण झालेला आहे. त्यांना शासकीय सेवेत नियमित करून घेण्यासाठी प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात पाठवून नियमित केल्याबाबतचे आदेश त्वरित देण्याकरीता शिल्पा रेलकर यांनी तक्रारदारांकडे आठ हजाराची मागणी केली होती. तक्रारदाराने नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यासंदर्भात तक्रार केली होती. रेलकर यांनी तक्रारदाराला पैसे घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील प्रशासकीय कार्यालयात बोलाविले होते.

लाचलुचपतविरोधी पथकाने शुक्रवारी सायंकाळी जिल्हा रुग्णालयातील प्रशासकीय कार्यालय परिसरात सापळा लावला. तक्रारदाराकडून पंचासमक्ष आठ हजारांची लाच स्वीकारताना रेलकर यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक नीलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरचे पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर, पोलीस निरीक्षक श्याम पवरे, पोलीस निरीक्षक दीपक करांडे, पोलीस हवालदार तनवीर शेख, हारून शेख, पोलीस नाईक प्रशांत जाधव, रमेश चौधरी, विजय गंगुल, रवींद्र निमसे, वैभव पांढरे, राधा खेमनर, संध्या म्हस्के यांच्या पथकाने केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post