साईबाबांच्या जन्मभूमी वाद जाणार न्यायालयात
माय अहमदनगर वेब टीम
परभणी- पाथरी ही साईबाबांची जन्मभूमीच असून याच मागणीवर आपण ठाम आहोत. या मागणीसाठी आता न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय गुरुवारी (दि.23) पाथरी येथे झालेल्या कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात यासाठी कृती समितीच्या वतीने याचिका दाखल केली जाणार असून येत्या सहा महिन्यात समितीच्या माध्यमातून उपलब्ध पुराव्यांआधारे जन्मस्थळाचा सोक्षमोक्ष लावावा, अशी मागणी याद्वारे केली जाणार असल्याचे साईबाबा जन्मभूमी मंदिराचे विश्वस्त, कृती समितीचे अध्यक्ष आ. बाबाजानी दुर्राणी यांनी दिली.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शिर्डीकरांशी चर्चा करतांना पाथरीला देण्यात येणारा 100 कोटी रुपयांचा निधी हा तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमाअंतर्गत दिला जात असल्याचे जाहीर केले होते. त्याचे तीव्र पडसाद उमटून पाथरीकरांनी मंगळवारी (दि.21) ग्रामसभा घेऊन या प्रश्नावर राज्य शासनाकडे समिती गठीत करण्याची मागणी केली होती. खा. संजय जाधव, आ. सुरेश वरपुडकर यांनी बुधवारी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी समिती स्थापन करण्यास नकार देत, शंभर कोटी रुपयांतून विकास कामे करा, असा सल्लाच दिला होता.

Post a Comment