धक्कादायक! नोव्हेंबरमध्ये राज्यात 300 शेतकरी आत्महत्या


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई- नोव्हेंबरमध्ये सत्ता स्थापनेसाठी शह-काटशहाचा खेळ सुरू असताना राज्यात मात्र 300 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानामुळे शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या असून गेल्या चार वर्षातील आकडेवारीच्या तुलनेत एका महिन्यात शेतकर्‍यांनी आत्महत्या करण्याचा हा आकडा सर्वाधिक असल्याचंही स्पष्ट झालं आहे. यापूर्वी 2015 मध्ये महिन्याभरात 300 हून अधिक शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचं उघड झालं होतं.

राज्याच्या महसूल विभागाच्या आकडेवारीतून शेतकर्‍यांच्या आत्महत्येची ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. अवकाळी पावसामुळे राज्यात ऑक्टोबरमध्ये आत्महत्येच्या घटनांचे प्रमाण वाढल्याचेही दिसून आले आहे. अवकाळी पावसामुळे 70 टक्के खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. यापूर्वी 2015 मध्ये राज्यात 300 हून अधिक शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या होत्या. तर गेल्या वर्षी ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण 61 टक्क्यांनी वाढल्याचेही महसूल विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाल.

दोन आठवड्यात 39 शेतकरी आत्महत्या
सातत्याने दुष्काळाचा सामना करणार्‍या एकट्या मराठवाड्यात नोव्हेंबरमध्ये 120 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या असून त्यापाठोपाठ विदर्भात 112 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्यात 2019 मध्ये एकूण 2532 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या होत्या. तर 2018 मध्ये हा आकडा 2518 इतका होता. अवकाळी पावसामुळे राज्यातील एक कोटी लोकांना फटका बसला असून त्यात मराठवाड्यातील 44 लाख शेतकर्‍यांचा समावेश असल्याचे या आकडेवारीत नमूद केले आहे.,

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post