प्रभाग ४ मधील महिलांना घरातील कचऱ्यापासून खतनिर्मितीचे प्रशिक्षण
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर– ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करून त्यापासून घरच्या घरी जैविक खत तयार केल्यास निसर्गाचा योग्य समतोल राखण्यात यश येईल. त्यासाठी प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला स्वच्छता रक्षक बनविण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन स्वच्छता रक्षक समितीच्या सुधा खंडेलवाल व ज्योती दीपक यांनी केले आहे.
शहरातील प्रभाग ४ मध्ये घरातल्या कचऱ्यापासून खत कसे बनवायचे याबाबत नागरिकांना प्रशिक्षण देण्यात आले.यावेळी त्या बोलत होत्या. सौ.खंडेलवाल आणि दीपक यांनी चैतन्यनगर येथील महिलांना यावेळी शास्त्रोक्त प्रशिक्षण दिले. यावेळी नगरसेवक योगीराज गाडे तसेच प्रभागातील महिला जोत्स्ना खिस्ती, मोना बजाज, रेखा साधवानी, गीता नंदा, शैला बागडे, प्रेरणा बागडे, लता कुक्कडवाल, शकुंतला पाटील, विमल शिंदे आदी उपस्थित होत्या.
नागरिकांनी कचऱ्याबाबत सुरक्षेच्या सर्व उपाययोजना अमलात आणून जैविक खत बनविण्यास सुरवात केल्यास महापालिका प्रशासनावरील भार कमी होऊन प्रत्येक नागरिकाला स्वत;सह पुढील पिढीचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत होईल. कचऱ्याचे योग्य पद्धतीने विघटीकरण केले तर प्लास्टिकचे रिसायकल होईल. त्यामुळे पर्यावरणाची हानी होणार नाही असे सौ.खंडेलवाल व दीपक यांनी महिलांना समजून सांगितले.
नगरसेवक योगीराज गाडे म्हणाले कि नागरिकांना कचऱ्यापासून होणारे दुष्परिणाम व चांगल्या पद्धतीने विल्हेवाट लावल्याचे फायदे याबाबत प्रभाग ४ मधील प्रत्येक कॉलनीत आठवड्यातून दोन ठिकाणी घरच्या घरी जैविक खतनिर्मितीबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रभागातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लागेल.
Post a Comment