महापालिका कर्मचारी हवालदिल



सातवा वेतन आयोग तर नाहीच पण ५ व्या व ६ व्या चा फरकही मिळेना  ; प्रशासन घेईना मागण्यांची कुठलीही दखल
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - राज्य शासनाने सर्व सरकारी - निम सरकारी कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू केलेला आहे. त्याची अंमलबजावणी १ जानेवारी २०१६ पासून सुरु झालेली आहे. मात्र ४ वर्ष झाले तरी महापालिका कर्मचाऱ्यांना तो अद्याप लागू केलेला नाही. इतकेच नव्हे तर ५ व्या व ६ व्या वेतन आयोगाचा फरकही देण्यास चालढकल केली जात आहे.कर्मचाऱ्यांकडून वारंवार मागणी करूनही प्रशासन काहीच दखल घेत नसल्याने कर्मचारी हवालदिल झाले आहेत.

राज्य शासनाने सातवा वेतन आयोग सर्व सरकारी - निम सरकारी कर्मचा-यांना लागू केलेला आहे. सदरचा वेतन आयोग हा दि. १ जानेवारी २०१६ पासुन लागू झालेला आहे. परंतु अद्याप पर्यंत नगर महापालिकेतील कर्मचाऱ्यांना तो लागू केलेला नाही. त्यामुळे कर्मचारी वर्गात प्रचंड नाराजी आहे. तसेच कर्मचाऱ्यांचा सहाव्या वेतन आयोगाचा फरक महापालिका प्रशासनाकडे थकीत आहे. सहाव्या वेतन आयोग फरकाबाबत प्रशासनाची वारंवार चर्चा होवून देखील अद्यापपर्यंत कर्मचाऱ्यांना फरकाची एक रकमी रक्कम मिळालेली नाही. तसेच महापालिकेतील काही कर्मचाऱ्यांच्या पाचव्या वेतन आयोगाच्या फरकाबाबत न्यायालयात दावा प्रलंबित होता. त्या दाव्याचा निकाल लागलेला असुन सदर कर्मचाऱ्यांना पाचव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम तातडीने अदा करणे बाबत न्यायालयाने आदेश दिलेले आहेत. तरीही याबाबत अद्यापपर्यंत मनपा प्रशासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही.

या शिवाय एल.एस.जी.डी.पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यास टाळाटाळ होत आहे. ज्यांना पदोन्नती मिळालेली आहे, त्यांनाही कायम आदेशाची प्रत देण्यास जाणून बुजून त्रास दिला जात आहे. वैद्यकीय प्रतिपूर्ती बिले देण्यासही चालढकल केली जात आहे.

कर्मचाऱ्यांचे आ. संग्राम जगताप यांना साकडे

महापालिका कर्मचाऱ्यांच्या या विविध प्रलंबित प्रश्नांची कोणीच दखल घेत नसल्याने या कर्मचाऱ्यांनी आ.संग्राम जगताप यांची भेट घेवून त्यांच्या पुढे आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी विजय बोधे, बलराज गायकवाड, नंदू नेमाने, अंबादास वाघ, संजय पटेकर, रमेश नागुल, रेवती जोशी, सविता गोणे, मिठू ठोंबे, सुनिल पठारे, मारुती विधाते, राहुल शिंदे, अशोक बिडवे, बाळासाहेब आदमाने आदी उपस्थित होते.

शहराचे लोकप्रतिनिधी या नात्याने आपण कर्मचाऱ्यांच्या सदर प्रश्नांबाबत जातीने लक्ष घालून मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग तातडीने लागू करावा, सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम एक रकमी तातडीने अदा करणे बाबत, तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार पाचव्या वेतन आयोगाचा फरक तातडीने अदा करणे बाबत महापालिका आयुक्तांसह प्रशासनाला सांगावे असे साकडे यावेळी या कर्मचाऱ्यांनी आ. जगताप यांना घातले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post