ग्रामपंचायतीतील आर्थिक गैरव्यवहार ; तत्कालीन उपसरपंच व ग्रामसेवकावर अखेर फसवणुकीचा गुन्हा दाखल
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- नगर तालुक्यातील मजले चिंचोली ग्रामपंचायत मध्ये महिला सरपंचाच्या बोगस सह्या करुन सुमारे ५७ लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी तत्कालीन उपसरपंच व ग्रामसेवकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.२५) दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल झाला आहे.
तत्कालीन उपसरपंच धर्मनाथ आनंदा आव्हाड व ग्रामसेवक श्रीकांत पोपट जऱ्हाट असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच गितांजली अविनाश आव्हाड यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की, आपण सन २०१४ ते २०१९ या कालावधीत मजले चिंचोली ग्रामपंचायतच्या सरपंच होतो. या काळात उपसरपंच असलेले धर्मनाथ आनंदा आव्हाड व ग्रामसेवक श्रीकांत पोपट जऱ्हाट यांनी खोट्या ग्रामसभा दाखवत बनावट ठराव तयार केले व त्यावर महिला सरपंचाची बनावट सही व शिक्के मारुन मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या कामात तब्बल ५७ लाख १५ हजार ४१७ रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केला. याबाबत आपण सरपंच असतानाही आपणास तसेच इतर ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनाही अंधारात ठेवण्यात आले. या बनवाबनवीत या दोघांनी जिल्हा परिषद प्रशासन व राज्य शासनाचीही फसवणूक केली आहे.
तत्कालीन सरपंच गितांजली आव्हाड यांच्या या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिसांनी धर्मनाथ आव्हाड व श्रीकांत जऱ्हाट यांच्या विरुद्ध भा.दं.वि. कलम १९३, १९६, १९९, २००, ४६८, ४६९, ४७१, ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हे.कॉ. थोरवे हे करीत आहेत.
तब्बल वर्षभराच्या लढ्यानंतर झाला गुन्हा दाखल
मजलेचिंचोली ग्रामपंचायतमध्ये तत्कालीन उपसरपंच धर्मनाथ आव्हाड व ग्रामसेवक श्रीकांत जऱ्हाट यांनी केलेल्या आर्थिक ग़ैरव्यवहाराची माहिती मिळाल्यानंतर गेल्या वर्षभरापासून तत्कालीन सरपंच गितांजली आव्हाड या याबाबत गुन्हा दाखल व्हावा यासाठी पाठपुराव करत होत्या. जिल्हा परिषद प्रशासनाकडे वारंवार निवेदन देवूनही त्यांनी कुठलीही दखल घेतली नाही. एमआयडीसी पोलिसांकडूनही गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे अखेर आव्हाड यांनी जिल्हा न्यायालयात दाद मागितल्यानंतर जिल्हा न्यायाधीश श्रीमती शबनम शेख यांच्या आदेशानुसार एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी (दि.२५) याबाबत गुन्हा दाखल केला आहे.
Post a Comment